तारापूर प्रदूषण नियंत्रणासाठी बैैठक; पालकमंत्र्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:04 PM2019-07-24T23:04:19+5:302019-07-24T23:04:28+5:30
मंत्रालयात घेतली तातडीची बैठक, दिले महत्वपूर्ण आदेश
पंकज राऊत
बोईसर : राष्ट्रीय हरित लवादाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत संपूर्ण देशात तारापूर प्रथम क्र मांकाचे प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र असल्याचे जाहीर करताच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या दालनात मंगळवार (दि.२३) तातडीची बैठक घेऊन तारापूरचे प्रदूषण नियंत्रणात आणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक सूचना तर काही त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्यासंदर्भात सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या बैठकीला दहिसर (मुंबई) च्या आमदार मनीषाताई चौधरी, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कैलास शिंदें, एमआयडीसीचे संतोष कारंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुर राऊत, म.प्र.नि.मंडळ (सायन) श.च. कोलकर, एम.आय.डी.सी.चे सल्लागार (पर्यावरण), पी.पी.नांदुसेकर, एम.आय.डी.सी. तारापूरचे उपअभियंता, आर.जी.तोतला, तसेच म.प्र.नि. मंडळाच्या तारापूर एकचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, तारापूर दोनचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी डॉ.अर्जुन जाधव, तारापूर येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापक जाधव तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुका युवा अध्यक्ष प्रणय म्हात्रे, नितीन राऊळ, जयेश घरत उपस्थित होते.
बैठकीत आ.चौधरी यांनी पालघरच्या समस्याबरोबरच तारापूरमधील प्रदूषणाबाबतचे भीषण वास्तव प्रखरपणे मांडले तर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांचे भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश देऊन नवीन ५० एम.एल.डी. क्षमतेच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रापैकी प्रथम २५ एम.एल.डी. प्रकल्प लवकरात कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तर एम.एस.ई.डी.ने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी त्वरित विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश देऊन सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत तारापूर एम.आय.डी.सी.मध्ये रासायनिक टँकरला प्रवेश बंद करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले तर मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही लावून त्याचे मॉनिटरिंग करून कारखान्यातील बोअरवेलच्या पाणी वापरावर व ते वाहून नेणाºया टँकरवर बंदी घालण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी एमआयडीसीमधील प्रेशर अॅण्ड नॅचरल गॅस वाहिनी टाकण्याचे काम पूर्ववत सुरू करण्यास सांगितले. मात्र ते काम पावसाळ्यानंतर सुरू केले जावे, अशी सूचना केली. तर एम.पी.सी.बी.च्या मापदंडाप्रमाणेच कारखान्यांनी रासायनिक सांडपाणी सोडावे असे आदेश दिले.