11 ची ‘डेडलाइन’ पाळताना व्यापारी, नागरिकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:16 AM2021-04-22T00:16:58+5:302021-04-22T00:17:14+5:30
दुपारी १ वाजेपर्यंत वेळ वाढविण्याची केली आहे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना रुग्णांची वाढती संख्या थोपविण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेची ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेत्यांसह ते खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करून ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर मृत्यूंचीही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त किराणा आणि भाजी विक्रेत्यांना सकाळी ११ पर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेचे काटेकोर पालन करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत पोलिसांची वाहने ध्वनिक्षेपकावरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असतात. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून किंवा कारवाईच्या भीतीने ११ पर्यंत ही सर्व दुकाने बंद होतात; परंतु मासळी, तसेच अनेक विक्रेत्यांना सकाळी ९ ते १० पर्यंत माल मुंबईतून आणल्यानंतर विक्रीसाठी अवघा एक ते दोन तासांचा अवधी मिळतो. त्यामुळे या विक्रेत्यांची दमछाक होते. त्याचवेळी ग्राहकांनाही सकाळी ११ नंतर किराणा किंवा भाजी मिळत नसल्यामुळे त्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही वेळ आणखी एक ते दोन तासांनी वाढवून द्यावी, अशी मागणी विक्रेते, तसेच ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
नियम न पाळणाऱ्या विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पालिका आणि पोलिसांकडून उगारला जात आहे. त्यातच त्यांना कोरोना चाचणीही आवश्यक केल्यामुळे ती करण्यासाठी या व्यापाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. त्यासाठीही आणखी मुदतवाढ मिळावी, असाही सूर जांभळीनाका आणि वागळे इस्टेट येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळी मासळी किंवा इतर माल खरेदीसाठी पहाटे मुंबईत जावे लागते. ते घेऊन येईपर्यंत सकाळी ९ ते ९.३० होतात. मग विक्रीसाठी मिळणारा अवधी अगदी अल्प आहे. यात वाढ करण्यात यावी.
- सीमा कोळी,
मासळी विक्रेती, ठाणे.
मी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत आहे. रात्री उशिरा रुग्णालयातून आल्यानंतर सकाळी घरातील कामे उरकून पुन्हा रुग्णालयात जाण्याची धावपळ असते. त्यात सकाळी ११ पर्यंतच किराणा आणि भाजी विक्री सुरू असल्यामुळे ती खरेदीसाठी मोठी कसरत होते.
- एक परिचारिका, ठाणे.