मेट्रो वसई-विरार पर्यंत, सीएमचा आचारसंहिताभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:19 AM2018-05-28T06:19:17+5:302018-05-28T06:19:17+5:30
मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले.
पारोळ - मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले. लोकलच्या प्रवासासाठी वसईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याने मीराभार्इंदरपर्यंत मेट्रो येणार असल्याचे सांगून ते क्षणभर थांबले. उपस्थितांना उद्देशुन म्हणाले, तुमच्या मनातले मी जाणले आहे. आता तुम्हीही माझ्या मनातले समजून घ्या, अशा मार्मिक शैलीत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात विरार पर्यंत मेट्रो धावणार असल्याचे संकेत शनिवारी वसईत दिले.
वसईतील एसटीची शहर बससेवा शिवसेनेच्या मंत्र्यांनी बंद केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रतिज्ञापत्र उच्चन्यायालयात शासनाने सादर केल्याचे सांगून वसईचा हरितपट्टा कायम ठेवणार असल्याचे महत्त्वपूर्ण आश्र्वासन देऊन, येथील जनतेस स्वतंत्र नगरपरिषद वा ग्रामपंचायत हवी असेल तर तसा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना आता दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल करत आहे. त्यांच्या मुलाला फितवलं गेलं आहे. त्यांचे वनगा कुटुंबियांवरचे प्रेम बेगडी आहे. वनगा कुटुंबीय आमचेच आहे उद्या मातोश्रीची दारे बंद झाल्यावर श्रीनिवास आमच्याकडेच येणार. त्याला आमची दारे तेंव्हाही उघडी असतील, असे सांगितले. येथील कायदा सुवव्यस्था भक्कम करण्यासाठी पोलीस आयुक्तालय घोषीत केले असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.