म्हात्रे खून : पोलिसांवर 30 वर्षांनंतर कारवाई होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:08 PM2018-08-20T23:08:18+5:302018-08-20T23:08:36+5:30
मागासवर्गीय आयोगाने मागविला अहवाल; बोगस साक्षीदारांवरही अॅक्शन
नालासोपारा : १९८८ साली घडलेल्या यादव म्हात्रे यांच्या निर्घृण खून खटल्यात धनदांडग्या मारेकऱ्यांना वाचविण्यासाठी गरीब आदिवासींना नाहक गोवणाऱ्या पोलिसांवर अखेर कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण या प्रकरणी राष्ट्रीय आदिवासी आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना व पालघर पोलीस अधीक्षकांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे.
१९८८ साली कामण येथील सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या खुनातील धनदांडग्या आरोपींना वाचविण्यासाठी गरीब आदिवासींना नाहक गोव्यात आले होते. त्यांनी कबुली द्यावी यासाठी त्यांचा अमानुष छळ करण्यात आला होता. दरम्यान त्यापैकी एका आदिवासीचा मृत्यू झाला होता.तर एक आदिवासी अजूनही मरणोन्मुख आहे.या लढ्यात आदिवासी सेवक व यादव यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे यांनी लढा दिल्यामुळे अटकेत असलेल्या आदिवासी आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
गेली ३० वर्षे हा लढा ते एकटे लढत आहेत. त्यांनी या खटल्यातील सीआयडी अधिका-यांची लबाडी कोर्टाच्या निदर्शनास आणली होती. या दुष्कृत्याचा जाब पोलिसांना आता मागासवर्गीय आयोगापुढे द्यावा लागणार आहे. त्यामुळे पोलिसांचे व या खटल्यात खोटी साक्ष देणाºयांचे धाबे दणाणले आहेत.त्यानुसार आता चौकशी व कारवाईची चक्रे वेगाने फिरणार आहेत.
काय आहे यादव खून प्रकरण...
कामण येथील यादव म्हात्रे यांचा २९ जून १९८७ साली गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते.हा खून होतांना पाहणारे प्रत्यक्षदर्र्शी व त्यांचे लहान बंधू गंगाधर म्हात्रे गेली तीस वर्षे आपल्या भावाच्या मारेकºयांना शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात ३० वर्षे झुंज देत आहेत.यात त्यांना हळूहळू न्याय मिळू लागल्यामुळे आरोपींचे धाबे दणाणले होते. त्यांच्यावर गेल्या वर्षी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली.
अनेक शस्त्रक्रि या व लाखो रूपये खर्च केल्यानंतरही वर्षभर ते बिछान्यावर पडून होते.त्यानंतरही बरे झाल्यावर आपल्या भावाच्या मारेकºयांना शिक्षा मिळावी हा एकच ध्यास घेतलेल्या म्हात्रे यांनी बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत आपला लढा सुरू ठेवला. आरोपींकडून आपल्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेवून त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. परिस्थीतीचे गांर्भीय लक्षात घेऊन राज्य माहिती आयुक्त थँक्सी थेकेकरा यांनी म्हात्रे यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी दोन महिने टाळाटाळ केल्यानंतर पोलिस संरक्षण दिले होते. नवे पोलीस अधीक्षक सिंगे यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे संरक्षण काढून घेतले. त्यांनी सिंगे यांची भेट घेऊन या प्रकरणी खुलासा मागीतला असता जिल्हा पोलीस संरक्षण कमिटीच्या निर्णयानुसार ते काढून घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या खटल्यात आदिवासींना गोवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिस अधिकाºयांवर व खोटी साक्ष देणाºयांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
खºया आरोपींना सोडून तीन आदिवासींना पोलिसांनी या प्रकरणात गोवले होते. दिलीप, अशोक व गणपत तुंबडा यांनी गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे अशोक तुंबडांचा १४ दिवसात तर त्याचे वडील गणपत तुंबडा यांचा वर्षभरात मृत्यू झाला. दिलीप तुंबडा हे हाडामांसाचा गोळा बनून जिवंत आहे. २२ वर्षानंतर तुंबडांची मुक्तता झाली. त्यानंतर मूळ आरोपींवर खटला भरला. त्यामुळे मुख्य आरोपींना अभय देण्यासाठी पोलिसांनी तुंबडाकुटुंबीयांचा बळी घेतल्याचे उघड झाले.