वाडा बसस्थानक तडकाफडकी स्थलांतरीत
By admin | Published: March 21, 2017 01:35 AM2017-03-21T01:35:32+5:302017-03-21T01:35:32+5:30
येथील बस स्थानक नव्या जागी अचानक स्थलांतरीत करण्याच्या एस.टी.आगाराच्या निर्णयामुळे प्रवासी, चाकरमानी, व विद्यार्थ्यांचे
वाडा : येथील बस स्थानक नव्या जागी अचानक स्थलांतरीत करण्याच्या एस.टी.आगाराच्या निर्णयामुळे प्रवासी, चाकरमानी, व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. सोमवारी बससेवा एस. टी.आगार येथील नवीन बसस्थानकापासून सुरू करण्याच्या निर्णयाने परगावीच्या बस या खंडेश्वरी नाका येथूनच वळविण्यात येत होत्या, तर वाडा आगारातून सुटणाऱ्या भिवंडी, कल्याण, ठाणे, नगर, पुणे, इत्यादी बसेस या जुन्या स्थानकातसुद्धा येणार असल्याचे आगारामार्फत सांगण्यात येत होते.
सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने आजूबाजूच्या परिसरातील इतर आगाराच्या बसने आलेले विद्यार्थी खंडेश्वरी नाक्यापासून धावपळ करीत परिक्षा केंद्रावर पोहचत होते. खंडेश्वरी नाका येथे बस पकडणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे आणि असुरक्षित आहे कारण तिथे कोणतीही शेड नाही आणि त्या रस्त्यावरून अवजड वाहने, ट्रक्स, आणि इतर वाहनांची सतत भरधाव वाहतूक सुरु असते त्यामुळे त्या ठिकाणी एसटी पकडण्याच्या धावपळीत अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे मत विद्यार्थी व प्रवासी व्यक्त करत आहेत.
जुने वाडा शहर ते नवीन बस स्थानक हे अंतरही लांबचे असल्याने रिक्षा किंवा इतर वाहनाने नवीन बस स्थानकापर्यंत पोहचावे लागणार आहे. यात सर्वात अधिक पीडला जाणार आहे तो सामान्य व गरीब प्रवासी कारण रिक्षाचे भाडे त्याला परवडणारे नाही. नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस स्थानक हे पूर्ण पडक्या स्थितीत असून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, लाईट, पंखे, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, गाड्यांचे वेळापत्रक, फलाट, उपहारगृह अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत तरीही घाईघाईने बसस्थानक स्थालांतरित का करण्यात आले असा संतप्त सवाल प्रवासी, विद्यार्थी व सामान्य नागरिक करीत आहेत.
वाहतूक समस्या व अवैध वाहतूक यासंदर्भात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भात विचार विनिमय झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही दिवसांत एसटी आगाराच्या जागेत बांधून तयार असलेले बस स्थानक दुरुस्त करून तिथे अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा एसटीचा प्रयत्न राहील व तिथेच बाहेरील डेपोच्या बसेससाठी स्थानक सुरु होईल, असे समजते. (वार्ताहर )