महावितरणच्या मुजोरीने संताप
By admin | Published: March 28, 2017 05:06 AM2017-03-28T05:06:11+5:302017-03-28T05:06:11+5:30
हजारो रुपयांचे वीज बिल घरगुती ग्राहकांना आकारल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी नोटीस पाठविली जाते
रवींद्र साळवे /मोखाडा
हजारो रुपयांचे वीज बिल घरगुती ग्राहकांना आकारल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी नोटीस पाठविली जाते. तसेच त्यांना संधी दिली जाते. मात्र, मोखाड्यातील धामणशेत येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थेट वीज मीटर काढून नेल्याने संतापाचे वातावरण आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता या अधिकाऱ्यांना मीटर काढून नेण्याचा अधिकार दिला कुणी? असा सवाल विचारला जात आहे.
धामणशेत येथील तीस ते पस्तीस मीटर खोडाळा महावितरणचे अधिकारी पी. टी. वाघ यांनी काढून नेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मुळात तेवढी वीज वापरलीच नसल्याने अंदाजे झालेली बील आकारणी आमच्यावर अन्याय करणारी असल्याची त्यांची तक्रार आहे. तिची दखल न घेता मीटर काढून नेल्याने ऐन परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
गेल्या काही महिन्यापासून जव्हार, विक्रमगडसह मोखाड्यातील मीटर धारकांना वीजबिल भरून सुद्धा पुन्हा पुढच्या महिन्यात हजारोंच्या वाढीव बिलाची आकारणी होत असल्याने ग्राहकांमध्ये फसवणूक होत असल्याची भावना आहे. या प्रकरणी संबधीत एजन्सीवर फौजदारी कारवाई सुद्धा झाली आहे. यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे. तरी सुद्धा भरमसाठ आकारणी करून वसुली केली जात आहे.
यात महत्वाची बाब म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेने वीज बिल भरणा बंद केल्यानंतर संबधित एजन्सीकडे वीज बिल भरले जावे, असे फलक सुद्धा या कार्यालयात लावले होते. यानंतर दोन महिन्याचा तालुक्याचा २४ लाखा पेक्षा अधिक भरणा कार्यालयाला प्राप्त झाला नसतांना या कार्यलयाने कोणतीच कार्यवाही केली नाही आणि यात ग्राहकांची फसवणूक झाली आहे परंतु महावितरण ग्राहकांनाच दोषी ठरवित असून याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे
महावितरणाच्या या पाठराख्या भूमिकेमुळे खाजगी कंपन्यांनी वीज बिल वसुलीच्या नावाखाली लाखो रूपयांचा भ्रष्टचार केला आहे. आता या रकमेची भरपाई करण्यासाठी महावितरण कोणतेही रिडींग न घेता वाढीव वीजबिल आकारून ग्राहकांची मोठी लूट करीत आहेत. त्यातच वाढीव मीटर आकारलेल्या ग्राहकांना तुम्ही बिल भरत नसल्याचे कारण सांगून मीटर काढून नेण्याचा मुजोर अधिकाऱ्यांनी सपाटा लावला असल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत वेळीच कारवाई न झाल्यास महावितरणविरोधात असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आधीच अघोषित भारनियमन, विजेच्या दाबात चढउतार होणे यामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहेत. त्यात ही नवी भर पडली आहे.