कोट्यवधींच्या ठगास अटक
By admin | Published: October 7, 2016 04:59 AM2016-10-07T04:59:05+5:302016-10-07T04:59:05+5:30
ध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरामध्ये घर देण्याची आकर्षक योजना व आमिषे दाखवून त्यांच्याकडून धनादेश सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांची रक्कम घेऊन पसार झालेल्या
विरार : मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरामध्ये घर देण्याची आकर्षक योजना व आमिषे दाखवून त्यांच्याकडून धनादेश सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांची रक्कम घेऊन पसार झालेल्या म्होरक्याला तेरा महिन्यांनी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील हुतात्मा चौकातून अटक केली. मोहमद आजम अब्दुल अजीम खान असे म्होरक्याचे नाव आहे.
मेसर्स आयोनिक (इकोसिटी) रिअॅलिटी प्रा.लि. आणि मेसर्स क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या दोन कंपन्यांनी विरारजवळील बोळींज येथे गृह प्रकल्पाची योजना आखली होती. या प्रकल्पामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरात घर देण्याची आमिषे दाखवण्यात आली होती. या दोन्ही कंपनींच्या भुलथापांना बळी पडून आयोनिक (इकोसिटी) रिअॅलिटी प्रा.लि. या कंपनीने जवळपास १ हजार ४०० लोकांकडून आणि मे.क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या कंपनीने सुमारे ४०० ते ५०० लोकांकडून सुमारे ६० ते ७० कोटी रुपयाची रक्कम उकळली होती. या दोन्ही कंपन्यांनी मिळून जवळपास सुमारे दोन हजार लोकांची फसवणूक केलेली आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या १ हजार १०३ लोकांनी कंपनी विरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात दोन्ही कंपन्यांविरोधात विविध कलम आणि मोक्का अॅक्टसह एमपीआयडी कायदा सन १९९९ चे कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मोहमद आजम अब्दुलअजीम खान याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने तो फेटाळल्याने तो १३ महिन्यांपासून फरार होता. अटक टाळण्यासाठी मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत होता. त्याने अनेक वेळा पोलीसांना गुंगारा देखील दिला होता.
याप्रकरणी पालघर पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना आरोपी मोहमद आजम अब्दूल अजीम खान यास अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते मागावर होते. आरोपीला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश, दिव-दमण, पुणे हा भाग पिंजून काढला होता. अखेर आरोपी हा मुंबईत असल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्याला मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून अटक केली. (वार्ताहर)
मे.आयोनिक (इकोसिटी) रिअॅलिटी प्रा.लि. व मे.क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या कंपनीमध्ये घर खरेदीसाठी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. तसेच आजपर्यंत पोलीसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केलेली नाही अशा व्यक्तींनी लवकरात लवकर आर्थिक शाखा पालघर येथे कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक नारायण पाटील यांनी केले आहे.