अल्पवयीन मुलीची वसईत सुखरूप सुटका
By admin | Published: August 20, 2016 04:27 AM2016-08-20T04:27:39+5:302016-08-20T04:27:39+5:30
बांगलादेशातील ढाका येथून नोकरी देण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीला मुंबईहून सुरतला विक्री करण्यात आले होते. त्या मुलीला सुरतला नेताना
विरार : बांगलादेशातील ढाका येथून नोकरी देण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीला मुंबईहून सुरतला विक्री करण्यात आले होते. त्या मुलीला सुरतला नेताना वसईच्या रेल्वे पोलिसांनी दलालासहित ताब्यात घेतले आहे. यातून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सचिन प्रकाश पाटील उर्फ सोनू (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यामार्फत पिडीत मुलीला सुरतला पाठवण्यात येत असताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
पिडीत अल्पवयीन मुलगी बांगलादेश मधील ढाका येथील आहे. अतिशय हलाखीची स्थिती आणि अज्ञानतेचा फायदा घेऊन नोकरीच्या आमिषाने तिला १९ मे २०१६ रोजी मुंबई आणले होते. मुंंबईच्या कामाठीपुरा येथे आणून तिची विक्री केली. तेथून तिला सूरत येथील एका व्यक्तीला एक लाख तीस हजारात वेश्या व्यवसायासाठी विकण्यात आले. सूरतला नेण्याच्या आदल्या दिवशी त्या मुलीली बाभोळा येथे एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी वसई रेल्वे स्थानकात फलाटावर गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांना पाहून पिडीत मुलीने आरडाओरडकरून पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता तिच्या सोबत असलेला एक व्यक्ती पळून जाऊ लागला. त्यालाही पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता या मुलीला बांगलादेशातून आणून वेश्याव्यवसाय करण्यात लावल्याचे उजेडात आले.
पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला बोईसर येथील रेस्नयू फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर अटक आरोपीवर विविध कलम आणि पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला.
आरोपी आणि पिडीत मुलीने सेक्स रॅकेटसंबंधी अनेक महत्वाची माहिती दिल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पिडीत मुलीच्या माहितीनुसार रॅकेटमध्ये आठ ते दहा जणांचा समावेश असून बांगलादेशहून अनेक मुली आणल्या आहेत.
याला आरोपीनेही दुजोरा दिल्याचे पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे एक मोठे आंतरराष्ट्रीय हे रॅकेट चालवणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.