मीरा भाईंदरमध्ये मद्यपी वाहन चालकांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:32 PM2019-01-01T19:32:22+5:302019-01-01T19:32:46+5:30
मीरा भाईंदरमध्ये मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढली असून थर्टीफस्टला पोलीसांनी १०६ मद्यपी चालकांवर कारवाई करुन वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढली असून थर्टीफस्टला पोलीसांनी १०६ मद्यपी चालकांवर कारवाई करुन वाहनं जप्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी ७८ मद्यपी चालकांवर कारवाई झाली होती. शिवाय वाहन कायदा मोडणाऱ्या ३७७ चालकांवर कारवाई करुन ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलिसांसह मिळुन डोंगरी चौकी, मॅक्सस मॉल, सावरकर चौक (गोल्डन नेस्ट), श्रीकांत जिचकार चौक (एस.के.स्टोन), निलकमल नाका, काशिमीरा नाका, मीरा गावठण नाका , वरसावे नाका व दहिसर चेक नाका आदी ठिकाणी तपासणी नाके उभारले होते.
स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या १०६ मद्यपी चालकांवर कारवाई करत त्यांची वाहनं जप्त केली. या मध्ये वाहतूक शाखेने ६७ मद्यपी चालकांवर तर पोलिसांनी ३९ मद्यपींवर कारवाई केली.
या शिवाय लायसन्स, हेल्मेट, विमा नसणाऱ्या तसेच मोटार वाहतूक नियम मोडणाऱ्या ३७७ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक जगदीश शिंदे यांनी सांगितले.
शहरात मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली असून २०१७ च्या थर्टीफर्स्टला पोलिसांनी ७८ मद्यपी चालकांवर कारवाई केली होती. तर २०१६ च्या थर्टीफर्स्टला ४५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई झाली होती.