मेहता पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ कायम; कर्जबाजारी नसल्याची सुनेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 08:46 AM2024-07-11T08:46:56+5:302024-07-11T08:47:03+5:30
पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्राच्या आत्महत्येमागचे कारण वसई रेल्वे पोलिस शोधत आहेत. मुलाच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने कर्ज नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे.
वसईच्या वसंतनगरी भागात राहणारे हरीश मेहता, त्यांचा मुलगा जय मेहता या दोघांनी सोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकातून नायगावच्या दिशेने रेल्वे रुळावरून जात लोकलखाली आत्महत्या केली होती. वसई रेल्वे पोलिसांनी खात्री पटल्यानंतर मृतांची ओळख नमूद केली. मंगळवारी रात्री हरीश व जय यांचे मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, मेहता कुटुंबियांच्या घरातून पोलिसांना इंग्रजी भाषेत लिहलेली चिठ्ठी सापडली आहे.
त्यामध्ये या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत असे लिहिलेले आहे. त्यामुळे ही नेमकी आत्महत्या आहे की अन्य प्रकरण कोणते? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी देखील मयत मेहता यांचे बँक तपशील, ईमेल, मोबाईल तपासले असता त्यात कर्ज असल्याचे आढळून आले नाही.
मोबाइलची तपासणी सुरू
पोलिसांनी जय आणि हरीश यांच्या मोबाइलची तपासणी चालवली असून, त्यात हरीश हे शेअर मार्केटचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, आत्महत्येबाबतचे ठोस कारण त्यातून निदर्शनास आलेले नाही. कर्ज वा कौटुंबिक वाद असल्याचे अजून तरी समोर आलेले नसून जय यांच्या पत्नीनेही कर्ज नसल्याचे सांगितले आहे. मेहता पिता-पुत्राच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे वरिष्ठ निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले.