मीरा भाईंदर भाजपा कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्षांनी आयोजित केला मेळावा; मेहता व समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 03:42 PM2021-11-12T15:42:21+5:302021-11-12T15:43:27+5:30
मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांनी ऍड. रवी व्यास यांची नियुक्ती केल्या पासून मेहता व समर्थक यांनी उघडपणे विरोध करत दंड थोपटले आहेत .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केलेल्या चर्चे नंतर पाटील यांनी १८ नोव्हेंबर रोजी भाईंदरच्या माहेश्वरी भवन येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे . यामुळे व्यास यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून विरोधात असलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेकडे त्यांचे समर्थक आणि विरोधक यांचे लक्ष लागले आहे .
मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांनी ऍड. रवी व्यास यांची नियुक्ती केल्या पासून मेहता व समर्थक यांनी उघडपणे विरोध करत दंड थोपटले आहेत . भाजपात मेहता समर्थक आणि मेहता विरोधक असे दोन तट पडलेले आहेत . व्यास यांच्या नियुक्ती विरोधात प्रदेश कार्यालयावर नगरसेवक , कार्यकर्ते यांनी धडक देत इशारे दिले होते . याद्वारे मेहतांनी शहरातील त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन भाजपा नेत्यांना करून दिल्याचे मानले जाते .
परंतु प्रदेश नेतृत्वाने मेहता व समर्थकांच्या दबावतंत्राला झुगारून भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून ऍड. व्यास यांच्यावरच शिक्कामोर्तब केले . तर मेहतांना प्रदेश सचिव पद दिले . परंतु मेहतांनी पक्षाने दिलेले प्रदेश सचिव पद जाहीरपणे नाकारून जिल्हाध्यक्ष पद नियुक्ती विरोधात मागे हटणार नाही अशी भूमिका दाखवून दिली . मेहता व समर्थक हे ऍड. व्यास यांना जिल्हध्यक्ष मनायला तयार नसून त्यांचा उल्लेख टाळला जात आहे .
या आधी तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदर पश्चिम येथे सुरु केलेल्या भाजपा जिल्हा कार्यालयाचे उदघाटन फडणवीस यांनी केले होते . पण त्या कार्यालयास देखील विरोध करत मेहतांनी त्यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनच्या सेव्हन स्क्वेअर शाळे बाहेरील भाजपा कार्यालय जिल्हा कार्यालय म्हणून सुरु ठेवले आहे . आज शहरात भाजपाची दोन वेगळी जिल्हा कार्यालये आहेत .
भाजपा नेतृत्वाने व्यास यांच्या जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती कायम ठेवत मेहतांच्या दबावाला भीक न घालण्याचा पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे . नुकतीच उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये जिल्हाध्यक्ष ऍड . व्यास यांनी काही भाजपा नगरसेवक , कार्यकर्ते , माजी जिल्हाध्यक्ष आदींसह फडणवीस व पाटील यांची भेट घेतली . शहरातील घडामोडी, भाजपाची संघटना , पुढील वर्षी होणारी पालिका निवडणूक आदींवर बातचीत झाली .
त्या नंतर प्रदेशाध्यक्षांनी ऍड. व्यास यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी १८ नोव्हेम्बरची वेळ देत स्वतः मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितल्याने त्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे . जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या ह्या पक्षाच्या मेळाव्या कडे मेहता व त्यांच्या समर्थकां कडून कसे प्रत्युत्तर दिले जाईल या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे .