मीरा भाईंदर महापालिकेची ८३ कोटी ६६ लाख पाणीपट्टी वसुली
By धीरज परब | Published: April 8, 2024 07:23 PM2024-04-08T19:23:57+5:302024-04-08T19:24:01+5:30
जानेवारी महिन्यापासून थकबाकीधारकांना पाणीपट्टी वसुल करणेकरीता प्रथम नोटीस बजावण्यात आल्या व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसुली केली गेली.
मीरारोड: २०२३ - २०२४ ह्या आर्थिक वर्षात मीरा भाईंदर महानगरपालिकेने ८३ कोटी ६६ लाख रुपये इतकी पाणीपट्टी वसूल केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत प्रती वर्षी पाणीपट्टी वसुलीकरीता विशेष मोहिम राबविण्यात येते. सॅन २०२३ - २०२४ ह्या आर्थिक वर्षात आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर अभियंता दीपक खांबित आणि कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांच्या नियंत्रणाखाली विशेष मोहिमेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, मेस्त्री, लिपिक व मिटर रिडर यांची नेमणूक करण्यात आलेली होती . सदर पथक थकबाकीदारकांची यादी तयार करुन प्रत्यक्ष थकबाकीधारकांना भेटी देणे, थकीत रक्कमेचा भरणा करणेकरीता प्रवृत्त करण्याचे काम करत होते .
जानेवारी महिन्यापासून थकबाकीधारकांना पाणीपट्टी वसुल करणेकरीता प्रथम नोटीस बजावण्यात आल्या व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसुली केली गेली. ज्यांनी नोटिसा देऊन सुद्धा पाणीपट्टी भरली नाही त्यांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम पालिकेने चालवली. या शिवाय नागरिकांमध्ये पाणीपट्टी भरणा जलद होणेसाठी जनजागृती करणेकरीता ऑटोरिक्षा वर ध्वनिक्षेपकाव्दारे जाहिर सुचना देण्यात येत होत्या . नागरिकांना पाणीपट्टी भरणे सोयीचे होणेकरीता महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच मोबाईल ॲप व्दारे पाणीपट्टी भरण्याची सुविधा दिली. सार्वजनिक सु्ट्टी, शनिवार व रविवार या दिवशी सर्व पाणीपट्टी भरणा केंद्र सकाळी सुरु ठेवली होती. त्यामुळे नागरीकांना पाणीपट्टी भरणे सोईचे झाले.
पाणीपट्टी भरणा करणेकरीता ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर दिला गेला . परंतु गृहनिर्माण संस्थां कडून धनादेश द्वारे पाणीपट्टी भरण्यास प्राधान्य दिले जाते . ऑनलाईन द्वारे ३ कोटी ३४ लाख ७३ हजार रुपये पाणीपट्टी गोळा झाली. तर रोख आणि धनादेश द्वारे ८० कोटी ३१ लाख ४६ हजार रुपये इतकी पाणीपट्टी लोकांनी भरली आहे. या आर्थिक वर्षात रु. ८३ कोटी ६६ लाख रुपये म्हणजेच ९२. ३४ टक्के इतकी पाणीपट्टी वसुली पालिकेने केल्याचे शरद नानेगावकर यांनी सांगितले .