मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:20 PM2023-10-04T19:20:58+5:302023-10-04T19:21:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराची मुदत २०१८ सालीच संपुष्टात आलेली असल्याने ठेका रद्द केला आहे . त्यामुळे ६६० सुरक्षा रक्षक हे सेवेतून कमी केल्याने त्यांच्या वेतनावर दर महिना १ कोटी ३५ लाख इतका खर्च वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे . तर अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज नुसार अहवाल देण्यास विभाग प्रमुखांना आयुक्तांनी सांगितले असून तेथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले जाणार आहेत .
मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळा , उद्याने , मैदाने , सभागृह , विविध कार्यालये , स्मशान भूमी , वाचनालय, पाण्याची टाकी, डम्पिंग आदी मालमत्तांच्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले जात होते . सैनिक सिक्युरिटी ह्या ठेकेदारा मार्फत ६६० सुरक्षा रक्षक पालिकेच्या सेवेत नेमण्यात आले होते . काम करणाऱ्या ह्या सुरक्षा रक्षकां मध्ये काही तत्कालीन नगरसेवक व राजकारणी, काही अधिकारी आदींच्या वशिल्याने देखील अनेक जण काम करत होते .
महापालिका आयुक्त काटकर यांनी सुरक्षा रक्षकांचा आढावा घेताना प्रशासकीय बैठकीत सैनिक सिक्युरिटीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या नुसार १ ऑक्टोबर पासून ठेका रद्द केला गेला . सदर ठेकेदाराची मुदत २०१८ सलातच संपलेली होती. त्यावेळी महासभेने सुरक्षा रक्षक मंडळ , सानपाडा यांच्या कडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सैनिक सिक्युरिटीला मुदतवाढ देण्याचा ठराव केला होता .
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार सैनिक सिक्युरिटी कडील कार्यरत सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्या करीता नोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . परंतु सुरक्षा रक्षक मंडळ कडून त्यावर सुद्धा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही . दुसरीकडे महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान सुरक्षेसाठी घेतलेले आहेत . त्यातील अधिकारी वर्गाला दिलेले जवान काढून घेण्यात आले आहेत . त्यांना पालिकेच्या अत्यावश्यक असलेल्या मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नेमले जाणार आहे .
दरम्यान ६६० खाजगी सुरक्षा रक्षक कमी झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली आहे . अचानक हातची नोकरी गेल्याने ते हवालदिल झाले आहेत . तर ठेकेदाराचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांना नेमण्यात वशिलेबाजी करणाऱ्यांची सुद्धा धावपळ सुरु झाल्याची चर्चा आहे .