महापालिकेच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला; पावसाळा सुरु होऊनही १६ बसचे वायपर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 07:54 PM2018-06-17T19:54:42+5:302018-06-17T19:54:42+5:30

मोठा पाऊस असल्यास बस स्थानकातून बस देखील सोडली जात नाही . 

Mira bhayander palika buses wipers are not working | महापालिकेच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला; पावसाळा सुरु होऊनही १६ बसचे वायपर बंद

महापालिकेच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला; पावसाळा सुरु होऊनही १६ बसचे वायपर बंद

Next

मीरारोड - पावसाळा सुरु होऊन देखील महापालिकेने सुमारे १६ बसच्या वायपर दुरुस्तीची कामे अत्यावश्यक असूनही केलेली नाहीत . पालिकेच्या या अक्षम्य हलगर्जीपणा मुळे वायपर नसल्याने चालकांना स्वतः सह प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून पावसात बस चालवाव्या लागत आहेत. वायपर बंद असल्याने अपघाताची भीती असून पालिकेच्या भोंगळ कारभाराची लक्तरेच पावसात टांगली गेली आहेत . 

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अनागोंदी मुळे परिवहन सेवेतील ५८ पैकी ३२ बसच रस्त्यावर धावत आहेत . टायर नाही , इंजिन बिघाड , देखभाल - दुरुस्ती नाही आदी कारणांनी तब्ब्ल २६ बस बंद आहेत .  सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे  बससेवा खिळखिळी झाली आहे . टायर खरेदी , देखभाल - दुरुस्ती सारख्या आवश्यक कामां चे पैसे अदा केले नसल्याने हि  नामुष्की ओढावली आहे . तर दोन चार दिवसात देयक अदा करून काम सुरु केले जाईल असे पालिकेचे आश्वासन देखील पोकळ ठरले आहे . 

 आधीच ढिसाळपणा व दुरावस्थे मुळे परिवहन सेवेला प्रवाशी त्रासलेले आहेत . पण दुसरा पर्याय नसल्याने त्यांचा पण नाईलाज झाला आहे . बस सारखे मोठे वाहन पावसाळ्यात चालवताना वायपर सुरु असणे अत्यावश्यक आहे . पण अजूनही सुमारे १६ म्हणजेच निम्म्या बसचे वायपर बंद आहेत . पावसाळा सुरु झाला असताना बसचे वापयर तातडीने दुरुस्त करून घेणे आवश्यक असताना त्या कडे देखील डोळेझाक केली जात आहे . 

वायपर बंद असल्याने पाऊस असला तर बस चालवणे जिकरीचे बनले आहे . बस चालक स्वतःच्या व प्रवाश्यांच्या जीवावर उदार होऊन कशीबशी बस चालवत आहेत. पाऊस जास्तच जोराचा आला कि मग मात्र बस सरळ रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहे . पाऊस जोरात सुरूच राहिला तर पाऊस कमी वा बंद होण्याची वाट पहात चालक व प्रवाश्यांना बस मध्ये ताटकळत बसून रहावे लागते . जर मागून एखादी वायपर सुरु असलेली बस आली तर त्या बस मध्ये प्रवाश्यांना पाठवले जाते . मोठा पाऊस असल्यास बस स्थानकातून बस देखील सोडली जात नाही . 

या सर्व द्रविडी प्राणायामामुळे प्रवाश्यांना फारच मनःस्ताप सोसावा लागत आहे . चाकरमान्यां सह विध्यार्थ्यांना या सर्व प्रकारां मुळे आपल्या इच्छित स्थळी पोहचायला उशीर होत आहे . बस चे वेळापत्रक कोलमडून पडले आहे . वायपर नसल्याने अपघाताची भीती असून विशेषतः चौक - उत्तन भागात तर वायपर बंद असलेली बस चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे . 

पालिकेची परिवहन बस सेवा प्रवाश्यांच्या जीवावर उठली आहे.  वायपरची दुरुस्ती पालिकेला करून घेता येत नाही आणि वायपर बंद असल्याने प्रवाश्यांचा जीव धोक्यात आलाय या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही . पालिकेच्या बससेवे मुळे मनःस्तापच वाढलाय . त्या पेक्षा एसटीचा आमचा लाल डब्बा चांगला होता.  
रोशन डिसोझा ( प्रवाशी ) 

पावसाळ्यात वायपर बंद असणे गंभीर बाब आहे . तातडीने वायपर सुरु करून घ्यावेत . जर या मुळे कुठलाही अपघात झाला तर त्याची जबाबदारी बस चालकासह संबंधित कर्मचाऱ्यांची असेल . 
जगदीश शिंदे ( वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक )
 

Web Title: Mira bhayander palika buses wipers are not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.