भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावर मद्यपींचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:12 IST2025-03-15T08:12:15+5:302025-03-15T08:12:15+5:30
पोलिसावरच चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले

भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावर मद्यपींचा हल्ला
मीरा रोड : धुळवडीच्या दिवशी शुक्रवारी दारू पिऊन भांडण करणाऱ्यांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावरच चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.
भाईंदर पोलिस ठाण्याच्या गोपनीय विभागात काम करणारे पोलिस हवालदार काशिनाथ भानुसे हे शुक्रवारी एकटेच साध्या वेशात गस्त घालून धुळवडीनिमित्त माहिती घेत होते. पोद्दार शाळेजवळ शिवमहिमा इमारत आणि मागील झोपडपट्टीदरम्यानच्या मैदानात दारूच्या नशेत असलेले काही जण भांडण करत असल्याचे पाहून भानुसे भांडण सोडवण्यासाठी गेले.
सात टाके पडले
याचा राग धरून दिलीप खडका उर्फ नेपाळी, कमलेश गुप्ता उर्फ बाबूसह त्यांच्या दोघा साथीदारांनी भानुसे यांच्याशीच हुज्जत घातली. त्यातच एकाने भानुसे यांच्या पोटात चाकू खुपसला.
रक्तबंबाळ अवस्थेत भानुसे यांना रुग्णालयात दाखल केले. भानुसे यांच्या पोटाला दोन टाके, तर हाताला ५ टाके पडले. जखम खोल व गंभीर असल्याने मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे. दिलीप गणेश देवलनगर इथे, बाबू चाचा भतिजा इमारतीत राहतो आहे.