मीरा रोड : बेकायदा बॅनरप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही, आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 07:12 PM2018-10-24T19:12:28+5:302018-10-24T19:12:50+5:30
बेकायदा बॅनरबाजी वरुन माजी महापौर कॅटलीन परेरा आदींनी लोटस नवरात्रीत पालिकेचे बोधचिन्ह वापरुन लावलेल्या बेकायदा बॅनर प्रकरणी कारवाई केली नाही म्हणून आयुक्त बालाजी खतगावकर यांना धारेवर धरले होते.
मीरा रोड - बेकायदा बॅनरबाजी विरोधात असंख्य तक्रारी असताना देखील महासभेत मात्र एकही गुन्हा दाखल केला नाही, अशी कबुली देतानाच वाटल्यास दोन दिवसात लाईनीने गुन्हे दाखल करतो, असं वक्तव्य करणाऱ्या पालिका आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी राज्यपालांसह लोकायुक्त आदींना केली गेली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सतत उल्लंघन करुन शहरात बेकायदा बॅनरबाजी सुरुच असल्याने त्या विरोधात सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता, जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम, आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा सह अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या बेकायदा बॅनरबाजी बद्दल वृत्त दिली आहेत. परंतु बॅनरबाजी करणारे बहुतांश राजकारणी व लोकप्रतिनिधीच असल्याने पालिका प्रशाससन या विरोधात कारवाई न करता बॅनरबाजांना पाठीशी घालण्याचे काम करते.
महासभेत सुद्धा बेकायदा बॅनरबाजी वरुन माजी महापौर कॅटलीन परेरा आदींनी लोटस नवरात्रीत पालिकेचे बोधचिन्ह वापरुन लावलेल्या बेकायदा बॅनर प्रकरणी कारवाई केली नाही म्हणून आयुक्त बालाजी खतगावकर यांना धारेवर धरले होते. त्यावेळी आयुक्तांनी एकाही गुन्हा दाखल केला नाही अशी कबूली दिली. वाटल्यास दोन दिवसात लाईनीने गुन्हे दाखल करतो असं देखील ते म्हणाले.
त्या वरुन आयुक्तांचे बेकायदा बॅनर व ते लावणारया बॅनरबाजांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप करत कृष्णा गुप्ता या विद्यार्थ्याने थेट राज्यपाल, लोकायुक्त , मुख्यमंत्री आदींकडे आयुक्तांची तक्रार केली आहे. आयुक्तांकडून जाणुनबुजून न्यायालयाचे आदेश व कायदे नियमांचे उल्लंघन होत असून त्यांनी महासभेत दिलेली कबुली धक्कादायक असल्याचे गुप्ता म्हणाले. आयुक्तांना बेकायदा बॅनर व बॅनरबाजां विरोधात कारवाई करायची नसल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.