सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे जव्हारमध्ये अपघात वाढले
By admin | Published: December 2, 2015 12:11 AM2015-12-02T00:11:45+5:302015-12-02T00:11:45+5:30
जव्हार सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दुर्लक्ष तसेच बेजबाबदारपणामुळे वर्षभरात रस्ते अपघाताच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी उप
जव्हार : जव्हार सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दुर्लक्ष तसेच बेजबाबदारपणामुळे वर्षभरात रस्ते अपघाताच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी उप अभियंता जाधव यांना पुन्हा लेखी निवेदन देवून हा रस्ता ८ तारखेपूर्वी दुरुस्त न केल्यास जव्हार फाट्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यात त्यांची डागडुजी झालेली नाही. तसेच खड्डे बुजवलेले नाहीत. यामुळे ते चुकविताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मोठे अपघात तसेच मोटारसायकल खड्यात आपटून गंभीर जखमी होणे, मोटारसायकल खड्यात आपटल्याने मागे बसलेली व्यक्ती मागच्यामागे पडणे अशा घटना वारंवार घडत असतात. परंतु पोलीस स्टेशन मध्ये या मृत्यू व अपघातांची नोंद हि रस्ते अपघात अशी होत असल्याने बांधकाम विभाग आपली जबाबदारी झटकून मोकळा होतो. एवढे अपघात होऊनही अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने सा.बां. विभागाला जाब विचारलेला नाही.
साधारण दोन महिन्यांपूर्वी जव्हार ते चोथ्याची वाडी आणि केळीचा पाडा या रस्त्यावर गाडी खड्यात आपटल्यामुळे मोटारसायकलवर मागे बसलेल्या एका आदिवासी महिलेचा पडून मृत्यू झाला. त्या नंतर काही दिवसांत ७ महिन्यांची गर्भवतीचा याच रस्त्यावरून प्रवास करताना वेळेपूर्वीच प्रसूती झाली अन् त्या बालकाचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्दैवी घटनां नंतर तेथे बांधकाम विभागाच्या विरोधात संतापाची लाट उसळली. यानंतर जुनी जव्हार ग्रामपंचायत चे सदस्य नरेंद्र मुकणे यांनी विभागाला ५ नोव्हे.रोजी लेखी पत्र देवून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. या पुढे जर खड्यांमुळे अपघात अथवा जीवितहानी झाल्यास सर्व ग्रामस्थ पक्षभेद विसरून तीव्र आंदोलन छेडू आणि त्यास सर्वस्वी उप कार्यालय जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा दिला होता. परंतु या पत्रालाही केराची टोपली दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, या पत्रा नंतर १५ दिवसातच याच रस्त्यावर रेखा वसंत सापटा (४५) या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. (वार्ताहर)