हरवलेले दाग-दागिने पोलिसांमुळे अवघ्या ६ तासात सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 21:42 IST2018-07-03T21:41:17+5:302018-07-03T21:42:01+5:30
पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे ६ तासात सापडले चोरीस गेलेले दाग-दागिने

हरवलेले दाग-दागिने पोलिसांमुळे अवघ्या ६ तासात सापडले
मुंबई - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून नालासोपारा येथे आलेल्या बलवीर शिकरवार (वय - ३६) यांच्या हरवलेल्या बागेतून हॉटेलातील कर्मचाऱ्याने लंपास केलेले दाग- दागिने ६ तासात पोलिसांनी शोधून काढले. माणिकपूर पोलिसांनी केलेली हि यशस्वी कारवाई आहे.
काल ग्वाल्हेरहून आलेल्या सामानसोबत असलेली बलवीरची नेव्ही ब्लु रंगाची बॅग नवघर येथील साईनाथ हॉटेलबाहेरील पार्किंगच्या ठिकाणी राहिली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास इन्होवा गाडीकडे बलवीर हे सामानाचे लगेज घेऊन नालासोपाऱ्यातील घरी निघाली. घरी गेल्यावर बलवीर यांच्या लगेजमध्ये सोन्या - चांदीचे दागिने असलेली नेव्ही ब्लु रंगाची बॅग सापडली नाही. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, सोनसाखळी, कानातले, अंगठ्या आणि चांदीचे पैंजण आदी दागिने होते. एकूण ५ लाख ४ हजार ४३० रुपयांचे हे दागिने होते. साईनाथ हॉटेलबाहेरील पार्किंगच्या ठिकाणी बलवीरने पुन्हा जाऊन बॅगचा शोध घेतला असता त्याला रिकामी बॅग आढळून आली. बलवीरला दागिने आता मिळणार नाहीच असे वाटले होते. हताश झालेल्या बलवीरने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बॅग शोध घेण्यासाठी साईनाथ हॉटेलजवळील फेरीवाले, रिक्षावाले यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी वीरेंद्रकुमार छोटूलाल भरती (वय - ३०) या हॉटेलमध्येच काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे हरवलेले दागिने सापडले असून पोलिसांनी केवळ ६ तासात हे हरविलेले दागिने बलवीरला शोधून दिले.