भातशेतीच्या नुकसानीची आमदार गायकवाड यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:27 PM2019-11-02T23:27:51+5:302019-11-02T23:28:24+5:30
हाजीमलंग परिसरात आढावा । शेतकऱ्यांशी संवाद
डोंबिवली : अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाजीमलंग परिसरातील उसाटणे, शेलारपाडा येथे झालेल्या नुकसानीची कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘क्यार’ आणि ‘महा’ ही दोन वादळे घोंगावत आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांतील अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. कापणीसाठी आलेले तयार भातपीक पुन्हा खाली पडून त्यातूनही आता अंकुर फुटले आहेत.
शेतीच्या नुकसानीच्या पाहणीचे आदेश सरकारने दिल्याने शुक्रवारी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाºया पोसरी, शेलारपाडा, उसाटणे आदी परिसरांत पाहणी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकºयांशी चर्चा करत नुकसानीची माहिती घेतली. तीन दिवस नुकसानीची पाहणी होणार असून, त्यानंतर एकत्रित तपशील वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथच्या पंचायत समितीच्या कृषी अधिकारी प्रज्ञा गवई,
सुनीता जाधव, मंगरूळ करवले यांनी दिल्याचे गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
ते पुढे म्हणाले की, सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन नियोजनात्मक धोरण ठरवून सरकार स्थापनेनंतर लवकरात लवकर भरपाई देण्यात येणार आहे. मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अंबरनाथचे संचालक राजेंद्र वारे, समाजसेवक प्रकाश बुधकर, ग्रामीण भागातील पदाधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.