"परिवहन सेवेचा ठेका रद्द करून ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा..."
By धीरज परब | Published: March 2, 2023 07:32 PM2023-03-02T19:32:25+5:302023-03-02T19:32:43+5:30
आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: बस चालकास भर रस्त्यात मारल्या प्रकरणी मीरा भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेचा ठेकेदार मेसर्स. महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चरचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाका, अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र देऊन दिला आहे.
बुधवारी मीरारोड स्थानकावरून १७ क्रमांकाची बस विनय नगर कडे जात असताना मेरी गोल्ड वसाहत जवळ दुचाकी वरून आलेला ठेकेदाराचा मुलगा गॅविन बोर्जिस याने बस थांबवून बस चालक रामेश्वर बिडवे यांना खाली उतरवले . नंतर दमदाटी करत मारले होते . याचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद केली . बुधवारी रात्री मीरारोड पोलीस ठाण्यात बिडवे यांच्या फिर्यादी वरून बोर्जिस वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या . सरनाईक यांनी आयुक्तांना पत्र दिले असून कर्मचाऱ्यांना मारहाण, शिविगाळ व दमदाटी करणे त्यांना वेळेवर पगार न देणे, अतिरिक्त काम करून घेणे अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी आपल्या कडे आल्या आहेत . गरीब बस चालकाला मारहाण केल्यामुळे जर चालकाचे मानसिक संतुलन बिघडले असते तर प्रवाश्यांनी भरलेल्या बसचा अपघात होऊन नागरिकांना जीवही गमवावा लागू शकला असता. ठेकेदार आपल्या गोरगरीब कर्मचाऱ्यांना सांभाळू शकत नाही, जनतेला योग्य सुविधा देऊ शकत नाही त्यातच अश्या घटनेने पालिकेची बदनामी झाली आहे असल्याने कारवाईची मागणी केली आहे.