एमएमआरडीएची सुनावणी हाणून पाडली, चार तासांच्या सुनावणीला विरोध; ५ हजारांहून अधिक वसईकरांचे दीड तास आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:49 AM2017-09-15T05:49:46+5:302017-09-15T05:49:55+5:30

प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले.

MMRDA hearing adjourned for four hours; More than 5 thousand Vasikekar agitation for one and a half hour | एमएमआरडीएची सुनावणी हाणून पाडली, चार तासांच्या सुनावणीला विरोध; ५ हजारांहून अधिक वसईकरांचे दीड तास आंदोलन  

एमएमआरडीएची सुनावणी हाणून पाडली, चार तासांच्या सुनावणीला विरोध; ५ हजारांहून अधिक वसईकरांचे दीड तास आंदोलन  

Next

वसई : प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले. गावागावात सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आयुक्त आणि राज्यसरकारशी बोलून पुढील सुनावणी घेतली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी यावेळी जाहिर केले. मात्र, आंदोलनकर्ते निघून गेल्यानंतर अधिकाºयांनी पुन्हा सुनावणी घेण्याचा केलेला प्रयत्नही कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याला वसईतून तीव्र विरोध असून सुमारे चाळीस हजार हरकती एकट्या वसईतून नोंदवण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियु्क्ती केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता नालासोपारा येथील दामोदर हॉलमध्ये एमएमआरडीएच्या प्रमुख नियोजनकार उमा उड्ूमुनिल्ली आणि माजी नियोजनकार डी. के. पाठक यांनी सुनावनीला सुरुवात केली. मात्र, माजी सरपंच रॉबर्ट डाबरे यांनी त्रिसदस्यीय समितीपैकी फक्त एकच सदस्य हजर असल्याने सुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगून जोरदार विरोध केला. त्यानंतर जनतेचा विकास आराखडा मंचाचे निमंत्रक मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीला प्रत्येक हरकतदाराला बोलावलेच पाहिजे. एकाच दिवशी सुनावणी न घेता सलग सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. तर पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक आणि जनआंदोलनाच्या डॉमणिका डाबरे यांनी शहरात सुनावणी घेण्यास विरोध करून गावागावातच सुनावणी झाली पाहिजे, असे सांगून ही सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. ती सगळ्यांनी उचलून धरल्याने गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दीड तास गोंधळ सुरु होता. आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, प्रा. विन्सेंट परेरा, रॉबर्ट डाबरे, एव्हरेस्ट डाबरे, जनआंदोलनाचे मिलिंद खानोलकर आदींसह कार्यकर्त्यांनी थेट अधिकाºयांना घेराव घालून सुनावणी बंद पाडली. मात्र, एमएमआरडीएच्या उमा उडूमुनिल्ली यांनी गोंधळ सुरु असतानाही सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता. त्यामुळे वातावरण तप्त झाले होते. एमएमआरडीए चलो जाव, हमारे गाव मे हमारा राज या घोषणेने सभागृह दणाणून गेले होते. सभागृह गर्दीने ओसंडून वाहत असताना खाली देखिल प्रचंड संख्येने लोक जमा झाले होते. लोकांचा संताप अनावर झाल्याने वातावरण तंग होऊ लागले होते. त्यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हस्तक्षेप केला. सुनावणीस लोकांची हरकत नाही. मात्र, लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून होत असलेली सुनावणी मान्य नाही. विकासाला वसईकरांचा विरोध नाही. पण, लोकांना उध्वस्त करून विकास होत असेल तर तो मान्य नाही. वसईकरांनी पोर्तुगीजांना हाकलून दिले होते हा इतिहास आहे. म्हणून सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न कदापीही सहन केला जाणार नाही. त्यासाठी गावागावात सुनावणी घ्या. गावकरी सहकार्य करतील असे आवाहन फा. दिब्रिटो यांनी अधिकाºयांना केले. सभागृहातील संताप लक्षात घेऊन पाठक यांनी सुनावणी स्थगित केली.

हाही प्रयत्न फसला
सुनावणी स्थगित झाल्याने कार्यकर्ते आणि हजारो लोक माघारी वळले. पण, एका तासातच एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सुनावणीचे सोपस्कार पार पाडण्यास सुरुवात केली. याची कुणकुण लागताच सुनील डिसिल्वा, रॉबर्ट लोपीस, डेव्हीट मच्याडो यांच्यासह जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात धाव घेऊन हाही प्रयत्न हाणून पाडला.
 

Web Title: MMRDA hearing adjourned for four hours; More than 5 thousand Vasikekar agitation for one and a half hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार