आयुक्तांविरुद्धच्या वादात मनसे एकाकी; शिवसेना, भाजप, काँग्रेस एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:45 AM2020-07-18T00:45:25+5:302020-07-18T00:45:46+5:30
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे.
वसई : मनसे विरुद्ध पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मात्र या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट नवनिर्माण सेना एकाकी पडताना दिसत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीने मात्र सावधगिरी बाळगत या मुद्यावर आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मनसेने आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ केल्याने इतर पक्ष आयुक्तांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. गुरुवारी विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
वालीव कोविड केंद्राच्या दुरवस्थेबाबत तक्रार करण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या मनसेच्या शिष्टमंडळाला आयुक्त गंगाथरन डी. यांनी भेटीची अनुमती देताना केवळ दोघेच भेटीला येतील, असेही स्पष्ट केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व इतर कार्यकर्त्यांनी आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यामुळे आयुक्त विरुद्ध मनसे असा वाद मागील दोन दिवस चांगलाच रंगला होता. मात्र मुख्यालयात आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ, पोस्टर, घोषणा व दमबाजी करणे वसईकरांना तसेच विविध राजकीय नेते मंडळींना अजिबात रुचले नाही. यामुळेच गुरुवारी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला, तसेच गरज पडली तर आयुक्तांच्या बचावासाठी आम्ही सर्व जण या मैदानात उतरू असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कॅप्टन नीलेश पेंढारी, भाजपचे नालासोपारा सचिव निरव शुक्ल, शिवसेनेचे नेते आणि विजय पाटील फाउंडेशनचे किरण शिंदे, काँग्रेसचे उपाध्यक्ष शम्स खान, शिवसनेचे उपविभाग प्रमुख नितीन चौधरी आदींचा समावेश होता.
आयुक्त चांगले काम करत असून, त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या मनमानीला लगाम घातला आहे. त्यांचे खच्चीकरण होत असल्यानेच चांगल्या कामासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे.
- कॅप्टन निलेश पेंढारी, सचिव, प्रदेश काँग्रेस कमिटी