राज ठाकरेंचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; 'त्या' वृद्ध शिक्षिकेला अवघ्या काही तासांत मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 04:57 PM2021-05-27T16:57:29+5:302021-05-27T16:58:23+5:30
राज ठाकरेंनी आश्वासन पाळलं; वसईतील वृद्ध शिक्षिकेच्या वृद्धाश्रमाला मोलाची मदत
वसई: तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील एका वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमाचं चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं. याच वृद्धाश्रमात राहत असलेल्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदतीसाठी साद घेतली. रणदिवे बालमोहन विद्या मंदिरात शिक्षिका होत्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे त्यांचे विद्यार्थी आहेत.
आज सकाळी राज ठाकरेंनी सुमन रणदिवेंशी फोनवरून संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शक्य तेवढी मदत वृद्धाश्रमाला केली जाईल, असं आश्वासन राज यांनी रणदिवे यांना दिलं होतं. त्यानंतर पुढील काही तासांत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली. राज ठाकरेंचे पुत्र अमित यांनीही रणदिवे यांच्याशी संवाद साधला. वृद्धाश्रमातील २९ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं.
नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोन
राज ठाकरेंनी सुमन रणदिवे यांना मदतीचं आश्वासन दिल्यानंतर अमित ठाकरेंनी परिसरातील मनसेच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्या. त्यानंतर थोड्याच वेळात वृद्धाश्रम परिसरात मदत पोहोचली. अमित यांनी रणदिवे यांच्याशी फोनवरून संवादही साधला. यापुढेदेखील वृद्धाश्रमाला सर्वोत्तोपरी मदत करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
राज ठाकरे आणि सुमन रणदिवे यांच्यात सकाळी झाला संवाद
राज ठाकरेंना फोनवरून नमस्कार करताच सुमन यांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं माडलं. 'वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर,' अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं. यावेळी कुंदा कशी आहे, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं.
"उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय", मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव; तौत्के वादळानं वृद्धाश्रम मोडकळीस
तू मध्यंतरी इथे आला होतास. पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत रणदिवेंनी राज यांच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लॉकडाऊन संपू दे. नक्की भेटायला येतो, असा शब्द राज यांनी रणदिवे यांना दिला. तब्येत ठिक आहे ना, अशी विचारपूस राज यांनी केली. रणदिवे यांनीदेखील राज आणि त्यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.