आजपासून मनसे उपोषण

By admin | Published: December 15, 2015 12:52 AM2015-12-15T00:52:50+5:302015-12-15T00:52:50+5:30

आश्रमशाळा व त्यांची वसतीगृहे यातील भयाण वास्तव दाखविणारी चित्रफीत मनसेने तयार केली असून या अनागोंदीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात

MNS fasting from today | आजपासून मनसे उपोषण

आजपासून मनसे उपोषण

Next

- हितेन नाईक,  पालघर
आश्रमशाळा व त्यांची वसतीगृहे यातील भयाण वास्तव दाखविणारी चित्रफीत मनसेने तयार केली असून या अनागोंदीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी दोनशे मनसे सैनिक उद्या मंगळवारपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहांची अनेक वर्षापासूनची दयनीय अवस्था, अनागोंदी कारभारा विरोधात न्यायालयीन याचिका दाखल होऊनही थोडाही फरक पडला नाही. करपलेल्या चपात्या, आळ्या पडलेले अन्न, मोडकळीस आलेली मुलींची शौचालये, मुदत संपलेले तेल, मसाला, बुरशी आलेले गहू अशा भयाण वातावरणामध्ये सध्याचे आदिवासी कसेबसे आयुष्य कंठत आहेत. आपल्या भागातील आदीवासी मंत्री तथा पालकमंत्री असतानाही ही अवस्था आहे. या सारखे दुसरे दुर्दैव नसल्याची भावना या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आदिवासी विभागाचे बजेट साडेपाच हजार कोटींचे असताना या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा व वस्तीगृहाच्या नरक यातना मागील १५-२० वर्षांपासून जराही कमी झालेल्या नाहीत.
स्वत: आदिवासी असूनही व त्या समाजाच्या व्यथा जवळून अनुभवणाऱ्या आदिवासी विकासमंत्री विष्णूसवरा यांच्याकडे मंत्रीपद गेल्यानंतर तरी या विद्यार्थ्यांच्या यातना संपुष्टात येतील या त्यांच्या भाबड्या आशेवर पाणी फिरवले गेल्याची संतप्त प्रतिक्रीया या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लघंन
१४ फेब्रुवारी २००५ रोजी उच्च न्यायालयात राज्यातील सर्वच आदीवासी आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये उत्कृष्ट अन्न, शुद्ध पाणी व इतर सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
०७ सप्टें. २००९ रोजी झालेल्या या याचिकेच्या सुनावणीत सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश दिले होते.

दोन महिन्यांपासून होत होते चित्रण
दोन महिन्यांपासून पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम, उपाध्यक्ष आशिष मेस्त्री, संजीव सतीश जाधव, सुल्तान पटेल, विवेक केळुस्कर, प्रणय पाटील आदीनी पालघरमधील कुर्झे, भोपोली, कावका (जव्हार), सासरा, न्याहाळा, ढेकाळे, मेढवण (खुटल) कासळगाव, बेटेगाव, दाबेरी आदीसह दोन वस्तीगृहाचे चित्रणकरून तयार केलेली चित्रफीत पत्रकार परिषदेत सादर केली.
यामध्ये विद्यार्थ्यांच्या हलाखीचे चित्रण दाखविल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून योग्य सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांच्या नेतृत्वाखाली दोनशे मनसे सैनिक आमरण उपोषणास बसणार आहेत.

Web Title: MNS fasting from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.