वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:02 PM2023-10-27T18:02:08+5:302023-10-27T18:03:05+5:30
वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला.
- मंगेश कराळे
नालासोपारा:- वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह माजी नगरसेवक प्रवीण भोईर, प्रफुल पाटील, पदाधिकारी जयेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्च्याला मार्गदर्शन करण्यासाठी शर्मिला राज ठाकरे या सुद्धा सामील झाल्या होत्या. आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नसून वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार असल्याचे भाषणात सांगून राज्य सरकारला ठणकावले आहे. तसेच पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांन वेळ नसल्यामुळे उदघाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेल्यामुळे वसई विरारकरांना पाच महिने पाण्यावाचून तडफडत ठेवण्यात आल्यामुळे मनसेने जाब विचारण्यासाठी मनपावर मोर्चा काढला होता. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी दुसर्या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही.
शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत. जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन असे शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सरकारला ठणकावले. या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मनसेची आक्रमक भूमिका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विरार पोलिसांनी मोर्च्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.