मोबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या संसारात विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 11:02 AM2021-12-28T11:02:17+5:302021-12-28T11:02:50+5:30

गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे.

Mobile and alcohol poisoned the lives of many! | मोबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या संसारात विष!

मोबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या संसारात विष!

Next

- हितेन नाईक

पालघर : मोबाइलमुळे वाढता विसंवाद, मद्य पिण्याचे वाढते प्रमाण तसेच चारित्र्यावर संशय आहे, अशा विविध कारणांमुळे गृहकलहात वाढ होताना दिसत आहे. वाढते वाद मिटल्यास अखेर अनेक संसार सुखीदेखील होतात, असेही दिसून आले आहे.

गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे. मोबाइल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, मद्य आणि नशा, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणारे छळ, आदी कारणांमुळे पती-पत्नीत वाद होऊन प्रकरण पोलीस ठाणे आणि न्यायालयात पोहोचण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ झाली आहे. त्यातील पुढे काही प्रकरणे काडीमोडापर्यंत देखील पोहोचली आहेत.

पती-पत्नीमधील वादांची ही प्रकरणे सर्वप्रथम भरोसा सेलकडे जातात. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात यश न आल्यास नाइलाजाने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जातो. लिव्ह इन रिलेशनमध्ये पाच वर्षे राहणाऱ्या दोन तरुण-तरुणींनी घरातून पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. त्या तरुणीचा मोबाइल चेक करणे, संशय घेणे, आदी बाबींसह मला आणि वडिलांना सकाळी डबा देत नाही, अशा अनेक कारणांसह हे प्रकरण भरोसा सेलकडे आल्यावर दोघांतील गैरसमज दूर करीत पुन्हा त्यांना एकत्र आणण्यात भरोसा सेलला यश आले.

चारित्र्यावर संशय हेच कारण
-    २०२०-२१ मध्ये १३ तक्रारी या चारित्र्यावर संशय घेतल्याप्रकरणी भरोसा सेलकडे आल्या होत्या. 
-   मोबाइलवर बोलणे, फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर नेहमी व्यग्र राहणे, हुंडा, मुलगा-सून त्रास देतात, जमीन वाद, परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध, आई-वडिलांचा त्रास, कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता आदी तक्रारी येत आहेत.

नेहमी आईशी बोलते म्हणून वाद
तक्रारींमध्ये नेहमी आईशी बोलणे, कौटुंबिक कलह, हुंडा,आई-वडिलांचा त्रास, मुलगा-सुनेचा त्रास, बहीण-भाऊ वाद, पतीचा चारित्र्यावर संशय आदी तक्रारीची कारणे आहेत.

बायकोचा जाच वाढला
पत्नीचाही जाच वाढल्याची प्रकरणे समोर येऊ लागली असून सन २०२० आणि २०२१ मध्ये प्रत्येकी एक-एक तक्रारीची नोंद करण्यात आलेली आहे. महिलांना कायद्याने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून काही महिलांकडून पतीविरोधात तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पुरुषांचा मनस्ताप वाढत आहे.

संसारात फुलले हास्य
२०२० मध्ये एकूण २३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील २१ तक्रारीमध्ये यशस्वीरीत्या समझोता करण्यात भरोसा सेलला यश आले असून २ तक्रारींमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
२०२१ मध्ये ४१ तक्रारी प्राप्त झाल्या असून १९ प्रकरणात यशस्वी समझोता झाला तर ८ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. उर्वरित १४ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्याच्या दृष्टीने भरोसा सेलचे वरिष्ठ अधिकारी कलगोंडा हेगाजे हे टीमच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Mobile and alcohol poisoned the lives of many!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.