आधुनिक शिक्षणात शाळांमधील पाटीपूजन झाले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 11:58 PM2019-10-08T23:58:14+5:302019-10-08T23:58:24+5:30
पूर्वीच्या काळी शिक्षणाचा श्रीगणेशा म्हणजे एक दगडी पाटी आणि त्यासोबत पांढरी पेन्सिल असा होता.
पारोळ : पूर्वी दसऱ्याच्या दिवशी दगडाच्या पाटीवर देवी सरस्वतीचे चित्र काढून प्रत्येक शाळेत पाटीपूजन केले जात असे. पण आता या आधुनिक शिक्षण पद्धतीत पाट्यांनाच जागा नसल्याने ओघानेच पाटी पूजनही बंद झाले आहे.
पूर्वीच्या काळी शिक्षणाचा श्रीगणेशा म्हणजे एक दगडी पाटी आणि त्यासोबत पांढरी पेन्सिल असा होता. विद्यार्थ्यांकडे या दोन गोष्टी असल्या की त्याचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होत होते. आज मात्र या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून गायब झाल्या असून दगडी पाटी तर कालबाह्यच झाली आहे. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या हातात वही -पेन आल्याने विद्यार्थ्यांना दगडी पाटी म्हणजे काय, हेच माहीत नाही.
पूर्वी दसºयाच्या दिवशी अंक असलेले सरस्वती देवीचे चित्र पाटीवर काढत. ज्या व्यक्तीला हे चित्र काढता येत असे त्याच्याकडे दसºयाच्या आदल्या दिवशी हे चित्र पाटीवर काढण्यासाठी मुले गर्दी करत असत. सकाळी पूजेचे साहित्य घेऊन मुले शाळेत येत आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेसमोर दगडी पाटी ठेवून त्याचे सामूहिक पूजन करण्यात येत असे. आरती झाल्यानंतर मुले शिक्षकांचे आशीर्वाद घेत. केवळ या पूजनासाठी पूर्वी दसºयाच्या दिवशी काही वेळ शाळा सुरू ठेवली जात असे. मात्र, सध्या सुरू असलेल्या या शिक्षणात दसºयाला होणारे पाटीपूजन बंद झाले आहे. एवढेच नव्हे तर आज दगडी पाटीही कालबाह्य झाली आहे.
असा होत होता दगडी पाटीचा उपयोग
दगडी पाटीला असलेली चौकोनी लाकडी रेखीव कडा आणि त्यामध्ये काळ्याभोर रंगाची पाटी. आताही काही ठिकाणी कदाचित या पाटीचा वापर होत असेलही पण ती ही दगडी पाटी नव्हे.
गेल्या आठ - दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाल्याचे हे द्योतक आहे. अनेक वर्षांपासून मुलांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये दगडी पाटीची भूमिका अतिशय मोलाची ठरत होती. विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवण्यापासून, अंकओळख करून देण्यापर्यंत या दगडी पाटीचा उपयोग होत होता.