मोहरम अर्थात हजरत हुसैन यांचा स्मृती दिन, बहिणीमुळे घटना कळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:20 AM2017-09-24T02:20:58+5:302017-09-24T02:21:04+5:30
इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले. ज्याने इस्लाम धमार्चा चेहरामोहराच बदलून टाकला.
- हुसेन मेमन ।
जव्हार : इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले. ज्याने इस्लाम धमार्चा चेहरामोहराच बदलून टाकला. हिजरी संवतचा (इस्लामिक वर्ष ) पहिला महिना म्हणजे मोहरम ! मोहरमच्या १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात इ.स.६८० मध्ये) मोहम्मद पैगंबर साहेब यांचे नातू (नवासे ) हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी युद्धात मारले होते, तो दिवस म्हणजे 'यौमे आशुरा' होय. याच दिवशी हजरत हुसैन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीमध्ये मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.
हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युद्धास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुस-या बाजुला यजिद यांच्या सैन्याची कमान उमर इब्ने सईद यांच्या हातात होती. युध्दाचे कारण -इस्लाम धमार्चे पाचवे खलिफा अमीर मुआविया यांनी खलिफाच्या निवडणुकीत समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. यजीद हा त्या काळी गुंड म्हणून प्रसिध्द होता. समाजात त्याची प्रतिमा डागाळलेली होती. त्यामुळे त्याकाळच्या मुस्लिम समाजबांधवांना यजीद खलिफा झाल्याचे रूचले नाही. यजिदने समाजाविरूध्द बंड केले पण यजिद समोर मोहम्मद पैगंबर यांच्या परिवारातील हजरत हुसेन यांचे आव्हान होते. कारण ते यजिदसमोर झुकण्यास तय्यार नव्हते. यजिदने हजरत हुसैन यांनी त्याला खलिफा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. हजरत हुसेन यांनी आपले मोठे बंधु इमाम हसन यांच्यासोबत आपल्या परिवारील लहान मुले व महिलांसह यजिदशी युद्ध केले. यात हजरत हुसेन यांच्या परिवारातील सर्वजण शहीद झाले. पण पराक्रमी योद्धा असलेल्या हुसेन यांचा ते पराभव करु शकले नाही. युद्धभुमीवर सायंकाळची (असरची) नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन नमाज साठी झुकले तेव्हा यजीदच्या सैन्याने हुसैन यांना शहीद केले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना 'शहीद-ए-आजम' म्हटले जाते.
बहिणीमुळे घटना कळली
युद्धात वाचलेल्या हजरत हुसैन यांच्या बहिणीमुळे ही घटना सर्व जगताला कळली व त्यानंतर झालेल्या उठावात यजीदचा पराभव झाला.हजरत हुसैन यांनी मुठभर नागरिकांच्या मदतीने त्या काळच्या जाचक हुकूमशाही विरूध्द कंबर कसली होती.