महिलांच्या आंदोलनाने मोखाडा पं. समिती ठप्प

By admin | Published: June 15, 2016 12:51 AM2016-06-15T00:51:04+5:302016-06-15T00:51:04+5:30

या तालुक्यात पाणी मुबलक असूनही केवळ नियोजनाच्या अभावी ते आदीवासींना मागूनही मिळत नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील महिलांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या कार्यालयात

Mokhada Pt by women's movement Committee jam | महिलांच्या आंदोलनाने मोखाडा पं. समिती ठप्प

महिलांच्या आंदोलनाने मोखाडा पं. समिती ठप्प

Next

मोखाडा : या तालुक्यात पाणी मुबलक असूनही केवळ नियोजनाच्या अभावी ते आदीवासींना मागूनही मिळत नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील महिलांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या कार्यालयात धरणे धरून तिचा कारभार ठप्प केला.
पाणी मिळावे म्हणून आदिवासी महिलांनी एकत्र येऊन प्रत्येक गावात पाणी हक्क संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीतील महिलांनी आज मोखाडा पंचायत समितीच्या कार्यालयात जलपूजन आणि अधिकाऱ्यांना सुबुध्दी मिळावी यासाठी धरणे धरून काम ठप्प केले. तर त्यांनी आरंभिलेल्या भजनांच्या आणि मृदुंगांच्या आवाजाने संपूर्ण कार्यालय दणाणले होते. यावेळी महिलांनी पाण्याची मागणी करून, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांना धारेवर धरले.
मोखाडा तालुक्यात २८ ग्रामपंचायती असून ५९ गावे २२२ पाडे आहेत. यामधील ५० टक्क्याहून अधिक गाव-पाडे टंचाईने ग्रस्त आहेत. आदिवासी गाव-पाडयांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांना रात्र-दिवस पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाणी टंचाईवर व टँकरने पाणी पुरवठयासाठी प्रतिवर्षी करोडो रूपये खर्च केले जातात. तसेच उपायोजनासाठी करोडो रूपयांची कामे केली जातात. मात्र, ती निकृष्ट असतात, त्याकडे अधिकारी डोळेझाक करतात. त्यामुळे शासन करोडो रूपये खर्चूनही आदिवासींच्या नशिबी पाणी टंचाई कायम राहत आहे.
प्रत्येक गावात महिलांनी स्थापलेल्या पाणी हक्क संघर्ष समितीने मोखाडा गटविकास अधिकारी यांना आदिवासींना पाणी देण्याची सुबुध्दी देवो, म्हणन देवाला साकडे घालण्याचे अनोखे आंदोलन प्रभु, संगिता भोये, हिरा तुंबडा आणि साधना वैराळे यांच्या नेतृत्वाखाली केले होते. मोखाडा पंचायत समितीच्या व्हरांडयापासून ते पूर्ण कार्यालयात महिलांनी ठिय्या मांडला होता. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातून हलताच आले नाही. यावेळी महिलांनी तबल्याच्या तालावर भजने गायली. दरम्यान दुपारी १ वाजेच्या दरम्यान गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे कार्यालयात आले. त्या अगोदर गटविकास अधिकाऱ्यांच्या बंद दालनाला महिलांनी हार घालून त्याची पूजा केली. गोडांबे येताच महिलांनी प्रश्नांचा आणि समस्यांचा भडिमार सुरू केला. यावेळी सभापती सारिका निकम, देखील उपस्थित होत्या. (वार्ताहर)

गढूळ पाणी पिण्याचा अधिकाऱ्यांना आग्रह
आम्हाला पाणी द्या, असा घोषा लावून पाचघर-करोळच्या रणरागीणींनी गोडांबेंची भंबेरीच उडवली. यावेळी त्यांनी आम्ही कोणते व कसे? चिखल मिश्रीत पाणी पितो, ते दाखविण्यासाठी त्यांनी ते एका बाटलीत भरून आणले होते. हे पाणी या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे असा हट्ट त्यांनी धरला होता.
१२ वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरूच होते. त्यामुळे कार्यालयात महिलांच्या आंदोलनाच्या दणक्याने संपुर्ण कामकाजावर परिणाम झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. या अनोख्या आंदोलनाने कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अचंबित झाले होते.
आंदोलनकर्त्या महिलांनी प्रामुख्याने गाव-पाडयातील विहीरीचे रुंदीकरण, खोलीकरण तसेच नव्याने विहिरी बांधण्याची मागणी केली आहे. तसेच टंचाईग्रस्त सर्व गाव-पाडयांना नियमित टँकरव्दारे पाणी पुरविण्याच्या मागणीवर महिला ठाम राहिल्या अखेर दुपारी ३०.३० वाजता गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखे आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले.

Web Title: Mokhada Pt by women's movement Committee jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.