पाच धरणे असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीतच जाणवतेय भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 12:02 AM2021-02-21T00:02:12+5:302021-02-21T00:02:31+5:30

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही.

Mokhada taluka, which has five dams, experiences severe water shortage in February | पाच धरणे असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीतच जाणवतेय भीषण पाणीटंचाई

पाच धरणे असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीतच जाणवतेय भीषण पाणीटंचाई

googlenewsNext

रवींद्र साळवे

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ मोखाडा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाली असून दापटी १/२ येथून १५ दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तालुक्यात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. 

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहोचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कायम आहे. 

या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनदेखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. 

टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० ते २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकरचालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते. डोळ्यात तेल घालून चातक पक्ष्याप्रमाणे आदिवासींना टँकरची दिवसभर वाट बघावी लागते. 

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊनदेखील शून्य नियोजनामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे, परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

Web Title: Mokhada taluka, which has five dams, experiences severe water shortage in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.