मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:22 AM2019-11-22T00:22:46+5:302019-11-22T00:22:54+5:30
बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव
- रविंद्र साळवे
मोखाड : ग्रामीण भागात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण - उल्हासनगर येथील एका मालकाने चक्क वेठबिगार म्हणून बंधक बनवले. या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या या गावात झालेल्या भेटीदरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठिबगारीच्या पाशातून मुक्त केले. गुरुवारी याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात मोहन भिका दिवे याने फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.
मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन याचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहते. पूर्वी ते भिवंडीतील पडघा येथे वीटभट्टीवर कामासाठी जायचे. गेल्या गणपतीच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले हा मालक आपल्या वडिलांसोबत वाडीत आला. त्याच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या काही लोकांनी मोहनचे कुटुंब आणि योगेश वायले याची भेट करून दिली. शेठ चांगला आहे या समजुतीने मोहनचे कुटुंब कामावर जायला तयार झाले. त्यावेळेस योगेश याने ३००० (तीन हजार रुपये) रोख बयाना दिला. त्यानंतर पुन्हा गणपती गेल्यावर काही दिवसांनी येऊन १०,००० (दहा हजार रुपये) इतकी रक्कम देत मी घटस्थापनेनंतर घ्यायला येईन असे सांगून गेला. नंतर ठरलेल्या दिवशी येऊन योगेश याने मोहन, त्याचे आई-वडील, आणि गौरी (७), बायडी (९) आणि शैली (१३) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर ५ नंबर येथे नेले. विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे त्यांच्याकडून करून घेतली. सुट्या मजुराला (रोजंदारीच्या) ४०० रुपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० आणि महिलेला १०० मजुरी दडून शोषण करत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाऱ्या मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.
दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जाण्याची मागणी केली असता मालकाने विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवत उर्वरित कुटुंबाला एक रुपयाही न देता गावाला पाठवले. जवळ वाचलेले १००० रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहोचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी पार अंधारात गेली. शासकीय योजनेतून घरकुल लागलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. दिवाळीनंतर गावातील कुणाकडून तरी ५०० रुपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि दोन बहिणींना उल्हासनगर येथे धाडले.
परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाला योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागे. बाहेर मिळालेल्या ३०० रु. मजुरीतून १०० रुपये त्यांना मिळत. कधी कधी तेही मिळत नसत. राजू हा गौरीला मारहाण तसेच शिवीगाळ करायचा. त्रासामुळे पळून जाण्याची इच्छा होती, पण शेठच्या भीतीमुळे काही करता आले नाही.
पोलिसांची मदत घेत केली सुटका
मोहनने वडील भिका दिवे यांना फोन करून सर्व सांगितले. शेवटी गावातील गावात त्यांनी याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
मोखाड्यातून पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह कल्याण, अंबरनाथमधील राजेश चन्ने, वासू वाघे आदी कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांची मदत घेत या पूर्ण कुटुंबाला मुक्त केले. या घटनेबाबत पंडित यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.