मोनाटोना कंपनीच्या संपाचे घोंगडे भिजतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:51 PM2019-06-15T23:51:37+5:302019-06-15T23:51:52+5:30
दिड वर्षापासून आहे बंद , शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ, कंपनी सुरू होण्याची चिन्हे नाहीत
- वसंत भोईर
वाडा : दि. १२ : या तालुक्यातील डाकिवली व घोणसई या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोनाटोना टायर ही कंपनी गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने कामगारांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही कंपनी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी कामगार करीत आहेत.
ही कंपनी दुचाकी व चारचाकी टायरचे उत्पादन करणारी आहे. या कंपनीत सुमारे ६०० ते ६५० च्या आसपास स्थानिक कामगार आहेत. विशेषत: कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील कामगार येथे काम करीत आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने कुठलेही ठोस कारण न देता कंपनी गेल्या दिड वर्षापूवीॅ बंद केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या कामगारांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. काम नसल्याने कुंटुबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा यक्ष प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. विजेचे दर वाढले असल्याने उत्पादन करणे परवडत नसल्याने त्यांनी कारखाने बंद केल्याचा कांगावा कारखानदार करीत आहेत.
कंपनीकडून काही दिवसांपूर्वी ती सुरू करण्यासाठी प्रस्ताव आला होता. कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदार इच्छूक आहे. जर का कंपनीने सहकार्य केले तर आम्ही मिटींगसाठी तयार आहोत. स्थानिक कामगारांना रोजगारासाठी वणवण फिरावे लागू नये म्हणून कंपनी सुरू करण्यासाठी कोकण विकास कामगार संघटना कामगारांच्या भल्यासाठी सहकार्य करायला तयार आहोत. मात्र कंपनीकडून पुन्हा संपर्क साधण्यात आलेला नाही.
- महेंद्र ठाकरे, सरचिटणीस,
कोकण विकास कामगार संघटना
डीप्लस झोनचा फायदा फक्त उकळला
वाड्यासारखा अतिमागास भागाचा विकास करणे व येथील सुशिक्षित बेरोजगार तरु णांना रोजगार उपलब्ध करून देणे या उदात्त हेतूने सन १९९२ मध्ये तत्कालीन सरकारने या भागात डी प्लस झोन ही योजना जारी केली. या योजनेत सरकारने कारखानदारांना सवलती दिल्या. या सवलतीचा फायदा घेत अनेक कारखाने येथे आले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे कारखाने येथे आले. मात्र काही कारखान्यांनी फक्त सवलतीचा लाभ घेऊन आपला गाशा गुंडाळला. तर काही कंपन्या सुरू आहेत. या भागात जवळपास ३५ ते ४० टक्के लोखंड बनविणारे कारखाने आले होते. मात्र यातील बरेचसे कारखाने बंद झाले आहेत.