डहाणूत सोमवारी भाजपाची भव्य रॅली, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:48 AM2017-12-24T03:48:44+5:302017-12-24T03:48:53+5:30
या नगर परिषदेमध्ये भाजपने नगराध्यक्षपदासह १५ जागा जिंकून डहाणूत पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केल्याबद्दल सोमवारी डहाणूत विशाल विजय रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीस केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
- शौकत शेख
डहाणू : या नगर परिषदेमध्ये भाजपने नगराध्यक्षपदासह १५ जागा जिंकून डहाणूत पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केल्याबद्दल सोमवारी डहाणूत विशाल विजय रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीस केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जि.प.अध्यक्ष विजय खरपडे, नौशिर इराणी यासह भाजपचे वरीष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. डहाणूचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत राजपूत यांना ही उमेदवारी देण्यास डहाणूची सून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा सिंहाचा वाटा होता.
डहाणू नगर परिषद हा वर्षानुवर्ष राष्ट्रवादीचा गड राहीली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या भरत राजपूत यांनी जोरदार लढत देऊन २५०० मताधिक्याने नगराध्यक्षपद जिंकून भाजपचा झेंडा रोवला. तर नगरसेवक पदाच्या १५ जागा जिंकून भाजपचे एकहाती सत्ता खेचून आणली. भाजपच्या या यशामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड गमवावा लागला आहे. भाजपच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.त्यामुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह सर्व नेते या विजय रॅलीत उपस्थित राहणार आहेत.