तीन कृषी कायद्यांविरोधात मोर्चा; डहाणू प्रांत कार्यालयासमोर हजारो जनवादी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:17 PM2021-01-01T23:17:55+5:302021-01-01T23:19:00+5:30
डहाणू प्रांत कार्यालयासमोर हजारो जनवादी महिलांचा ठिय्या
डहाणू : केंद्र शासनाने पारित केलेले कृषी सुधारणा कायदे त्वरित रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत एकवटलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शुक्रवारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने डहाणूच्या प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जनवादीच्या जिल्हाध्यक्षा प्राची हतीवेलकर, सचिव लहानी दौडा, सुनीता शिंगडा व सविता डावरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
डहाणूतील केटीनगर येथून हा मोर्चा काढण्यात आला. प्रांत कार्यालयाबाहेर महिलांनी ठिय्या मांडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना या वेळी निवेदन सादर केले.