महापौर मॅरेथॉनमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक, ८ डिसेंबरला वसई धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:07 AM2019-11-29T00:07:41+5:302019-11-29T00:07:59+5:30
टाईम इव्हेंटमधील सहभागी स्पर्धकांमध्ये वाढ, ३० हून अधिक एलिट धावपटू, कुटुंबासाठी नवी रेस गट आणि सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची ‘गेस्ट आॅफ हॉनर’ म्हणून उपस्थिती, ही यंदाच्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
नालासोपारा : टाईम इव्हेंटमधील सहभागी स्पर्धकांमध्ये वाढ, ३० हून अधिक एलिट धावपटू, कुटुंबासाठी नवी रेस गट आणि सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची ‘गेस्ट आॅफ हॉनर’ म्हणून उपस्थिती, ही यंदाच्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या साथीने नवव्या इंडिया बुल्स होम लोन्स वसई - विरार महापौर मॅरेथॉनबाबत बोलताना महापौर प्रवीण शेट्टी यांनी ही माहिती दिली. रविवार, ८ डिसेंबर रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशाच्या आघाडीच्या धावपटूचा सहभाग असलेल्या स्पर्धेत १८ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे. त्यापैकी ९०० पूर्ण मॅरेथॉनर्स, ३९०० अर्ध मॅरेथॉनर्स, ३४०० हून अधिक ११ किमी रनर्स, १०५० अॅथलीट ५ किमी टाईम गटात आणि मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स फॅमिली रन आणि २००० हून अधिक जण धमाल धावमध्ये सहभाग नोंदवतील. १.५ किमी, ३ किमी, ५ किमी, ७ किमी आणि ११ किमी ज्युनियर गटातील स्पर्धेसाठी ७००० हून अधिक स्पर्धक सहभागी होतील. बॅटल रन हा तीन सदस्यीय संघासाठी असलेल्या स्पर्धेसाठी ३० स्पर्धकांची नोंद झाली आहे. पुरुषांच्या पुर्ण मॅरेथॉनसाठी अडीच लाख तर, पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉनसाठी प्रत्येकी सव्वा लाख रुपये बक्षीस दिले जाते. हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गटात बक्षीसे देण्यात येणार आहेत.
इंडिया बुल्स होम लोन्स वसई - विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा अॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडिया (एएफआय) यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा वसई विरार मनपा आणि कला - क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. याबरोबरच या स्पर्धेचा मार्ग ही असोसिएशन आॅफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स (एआयएमएस) कडून प्रमाणित करून घेण्यात येतो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यावसायिक आणि हौशी अॅथेलिटस्च्या वेगवेगळ्या वयोगटांसाठी तब्बल ४५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतात. तर वसई - विरार परिसरातील स्पर्धकांसाठी वेगळी बक्षिसे असणार आहेत.
विशेष मॅरेथॉन ट्रेन...
इंडिया बुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ही ट्रेन सकाळी तीन वाजता चर्चगेट स्टेशनहून सुटेल व वसईला ४ वाजून २३ मिनिटांनी व विरारला ४ वाजून ३१ मिनिटांनी पोहोचेल. ही ट्रेन सर्व स्टेशनवर थांबेल. स्पर्धकांना वसई स्टेशन व विरार स्टेशनहून स्पर्धा स्थळी पोहोचण्यासाठी नि:शुल्क वाहतुकीची सेवा देण्यात येणार आहे.
आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी असणार गेस्ट आॅफ हॉनर....
या मॅरेथॉनसाठी महापालिकेने सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन आणि आॅलिम्पियन गोपी टी. याला आमंत्रित केले आहे. आशियाई मॅरेथॉन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळणारा गोपी टी. हा पहिला आणि एकमेव भारतीय आहे. त्याने २००६ च्या आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत २ तास १५ मिनिटे आणि २५ सेकंद अशी वेळ नोंदवली होती.
मॅरेथॉनचे घोषवाक्य...
दरवर्षी ही स्पर्धा वेगवेगळे संदेश घेऊन आयोजित केली जाते या वेळी ‘स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्ग समतोल पाळा’ ‘स्वच्छ वसई, हरित वसई’ याच बरोबर ‘एक्सपिरीयन्स द रन’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.