गणेश विसर्जन गर्दीप्रकरणी वसईत दोनशेहून जास्त गुन्हे; मनाई आदेश भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:06 AM2020-08-29T00:06:04+5:302020-08-29T00:06:17+5:30
ग्रामस्थांची जंगी मिरवणूक
नालासोपारा : वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असतानाही गणपती विसर्जनात सर्रास उल्लंघन केले जात आहे. गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनावेळी वसई-विरारमध्ये दोनशेहून जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, वसई पोलीस ठाण्यात दोन, वालीव पोलीस ठाण्यात एक आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे असे एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत.
अर्नाळ्यात सर्वच नियमच धाब्यावर बसवून ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढली. नियम धाब्यावर बसवून जंगी मिरवणूक काढणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता तसेच दुपारी २ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गौरी-गणपतीचे विसर्जन करण्याची मुदत असताना वेळेची मर्यादा ओलांडणाºया १०० ते ११० जणांवर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्नाळा गावात २३४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १९७ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या २७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. गावात कोरोनाचा कहर झाला असताना ग्रामस्थांनी शासनाचे नियम गांभीर्याने न घेता गर्दी केल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश अर्नाळा सागरी पोलिसांना दिले आहेत. याच गावात याआधी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्या वेळीही काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या आणि गौरी विसर्जनाच्या मिरवणुकीत गर्दी करणाºया ३ मंडळांवर, २ बेंजो पथकांवर तसेच १०० ते ११० आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रथम या सर्वांना नोटीस देऊन मग कारवाई करणार आहे. अर्नाळासारख्या गावात कोरोनाचा कहर असताना ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून नियमांचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - महेश शेट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे