वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाकाळात वाढली डासांची पैदास!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 02:20 AM2021-03-21T02:20:04+5:302021-03-21T02:20:47+5:30
प्रशासनाचे डास निर्मूलनाकडे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये मोठी नाराजी
विरार : कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढत असताना वसई-विरार महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठीच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे मात्र महापालिका क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे, अटींचे पालन करून जनजागृतीबरोबर नागरिकांना सोयी-सुविधा देण्यात आरोग्य प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र सध्या मच्छरांचे साम्राज्यही महापालिका परिसरात ठिकठिकाणी वाढू लागल्याने नव्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होत आहे. ताप, डेंग्यू, मलेरिया अशा प्रकारच्या रोगांची लागण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिका आरोग्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत असताना तो खर्च जातो कुठे, असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. कोरोनामुळे अनेक जणांचा रोजगार गेला आहे. नोकऱ्या सुटल्या आहेत. त्यामुळे जनता हतबल झाली आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसई-विरारमध्ये मलेरिया, डेंग्यूसारख्या भयानक आजाराने डोके वर काढायला सुरुवात केली, तर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचा मनस्ताप होऊ शकतो. महापालिकेने औषध फवारणी करून मच्छरांचा नायनाट केला पाहिजे, असे नागरिकांनी सांगितले.