कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू वसई-विरारमध्ये; महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:29 AM2021-02-07T01:29:43+5:302021-02-07T01:30:00+5:30
जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोरोनामुक्तीकडे
- जगदीश भोवड
पालघर : पालघर जिल्ह्यातील एकमेव वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू झालेल्यांचीही संख्या सर्वाधिक ठरली आहे. वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये आजवर २९ हजार ८५० रुग्ण बाधित झालेले असून मृत्यू झालेल्यांची संख्या ८९५ आहे. वसई-विरारनंतर पालघर तालुक्यामध्ये सर्वाधिक ८ हजार २६८ रुग्ण आढळले आहेत, तर १५० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पालघर जिल्ह्यामध्ये आजवर ४५ हजार ३३४ रुग्ण आढळलेले असून यापैकी ४३ हजार ८४२ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. मात्र त्याच वेळी जिल्ह्यात १ हजार १९९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात वसई-विरारमधील ८९५ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आजवर २ हजार १८८ रुग्ण आढळलेले असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. जव्हारमध्ये ६१५ रुग्ण आढळले असून ६ जण मृत्यू पावले आहेत. मोखाडा तालुक्यात २८७ जण बाधित ठरले, तर ५ जण मृत्यू पावले. तलासरी तालुक्यामध्ये २६५ बाधित ठरले, तर ४ जणांचा मृत्यू झाला. वसईच्या ग्रामीण भागात १ हजार ३६६ जण कोरोनाने बाधित ठरले, तर ४९ जणांना प्राण गमवावे लागले. विक्रमगड तालुक्यामध्ये ५९८ जण बाधित ठरले, तर ८ जण मृत्यू पावले. वाडा तालुक्यामध्ये १ हजार ८७२ लोक बाधित ठरले, तर ४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
वसई-विरारमध्येही कोरोना नियंत्रणात
पालघर जिल्ह्यामध्ये वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी आता मात्र आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या चांगल्या भूमिकेमुळे पालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात आला आहे. वसई-विरारमध्ये आजवर २९ हजार ८५० रुग्ण आढळले, तर ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या वसई-विरार शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये केवळ १७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
चार तालुक्यांत मृत्यूचे प्रमाण कमी
पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण दहापेक्षा कमी आहे. यामध्ये जव्हारमध्ये ६, मोखाडामध्ये ५, तलासरीमध्ये ४ तर विक्रमगडमध्ये ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. अन्य तालुक्यांपैकी डहाणूमध्ये ३९, वसई ग्रामीण ४९, तर पालघरमध्ये १५० जण मृत्यू पावले आहेत. मात्र आता संपूर्ण जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या अहवालात दिसून
येत आहे.
तालुकानिहाय मृत्यू
डहाणू ३९
जव्हार ०६
मोखाडा ०५
पालघर १५०
तलासरी ०४
वसई-विरार ८९५
वसई ग्रामीण ४९
विक्रमगड ०८
वाडा ४३