जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:18 IST2025-01-03T14:18:02+5:302025-01-03T14:18:57+5:30
याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी
जव्हार : मोखाडा तालुक्याची मातामृत्यूची घटना ताजी असताना एका मातेची प्रसूती होत असताना अचानक तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री घडली आहे. तिची प्रकृती चांगली होती, स्वतःहून प्रसूतीकरिता गेली, मात्र अचानक तिचा मृत्यू कसा झाला? याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील कुंता वैभव पडवळे (वय ३१) या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूतीकरिता जव्हार उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात नियमित उपचार सुरू होता, मात्र येथे सुविधा नाहीत, तुम्ही जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जा, असे सांगून पुढील उपचारासाठी तिला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मातेची ही तिसरी प्रसूतीची वेळ होती. रात्री १२ वाजेच्या दरम्यान तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला प्रसूतीगृहात दाखल करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली. काही वेळातच अचानक हृदय थांबले आणि मातेनी तिथेच दम सोडला. दरम्यान, बाळाचे ठोके सुरू असल्याने बाळाची प्रसूती करण्यात आली, मात्र प्रसूती होता होता बाळाचाही मृत्यू झाला.
माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती, तिचा नियमित उपचार कुर्झे प्राथमिक आरोग्य केंद्रात व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू होता. आम्ही तिला जव्हारला रुग्णालय दाखल केले. अवघ्या दहा मिनिटात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती मिळाली. थोड्या वेळाने बाळाचाही मृत्यू झाल्याची खबर मिळाली. आम्हाला हे ऐकून धक्काच बसला आहे.
- अंकुश विष्णू अतकारी, चाबके-तलवली, मातेचा भाऊ
प्रसूती वेळी माता व्यवस्थित होती, मात्र तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा अर्ध्या प्रसूतीतच मृत्यू झाला. बाळाला वाचविण्याचाही खूप प्रयत्न करण्यात आला, मात्र दोघांचा मृत्यू झाला. याबाबत शवविच्छेदनानंतर खरे कारण कळेल.
- भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक