वाढदिवस साजरा करण्यास चाललेल्या आईच्या काळजावर घाला; हातून ११ महिन्याचे बाळ निसटले, झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:29 PM2023-11-27T23:29:20+5:302023-11-27T23:29:43+5:30
सुरभी हॉटेल जवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना अंदाज आला नाही व दुचाकी घसरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून आपल्या दोन मुलांना घेऊन पतीसह जात असताना भाईंदर येथे दुचाकी घसरून मांडीवरील ११ महिन्याचे बाळ पडून त्याचे अपघाती निधन झाले.
भाईंदर पश्चिमेच्या बबूदा रेसिडेन्सी मध्ये कुणाल शहा, पत्नी जिग्ना, ५ वर्षांची मुलगी कियरा आणि ११ महिन्यांचा मुलगा दक्ष असे कुटुंब राहते. शनिवार २५ नोव्हेंबर रोजी जिग्ना यांचा वाढदिवस असल्याने ते गोराई समुद्रकिनार्यावरील एका रिसॉर्ट मध्ये वाढदिवस साजरा करणार होते. सायंकाळी ४ च्या सुमारास कुणाल हे जिग्ना, कियरा व दक्ष असे स्कूटररून गोराईला जाण्यास निघाले होते.
कियरा ही पुढे होती तर जिग्ना ह्या दक्षला मांडीवर घेऊन मागे बसल्या होत्या. परंतु राई आणि मोरवा दरम्यान सुरभी हॉटेल जवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना अंदाज आला नाही व दुचाकी घसरली. अचानक घडलेल्या ह्या घटनेने जिग्ना यांच्या हातातून दक्ष हा खाली पडला. चिमुरड्या दक्ष च्या डोक्याला जबर मार लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. तर कुणाल , जिग्ना व कियरा हे तिघेही जखमी झाले आहेत.
भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकात नाईकवाडे यांच्या मार्गदशनखाली पोलिस ह्या घटनेचा अधिक तपास करत आहेत.