माता, बालकांची तपासणी
By admin | Published: July 5, 2017 05:56 AM2017-07-05T05:56:05+5:302017-07-05T05:56:05+5:30
जिल्ह्यातील गरोदर, स्तनदा माता तसेच ० ते १ वयोगटातील बालकांची प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यातील गरोदर, स्तनदा माता तसेच ० ते १ वयोगटातील बालकांची प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येणार असून या सर्वांचा रेकॉर्ड एका सॉफ्टवेयर द्वारे संकलित केला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. हा उपक्रम प्रा. आरोग्य केंद्रामार्फत राबवून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ११ मुद्दे असलेली नवसंजीवनी योजना ही कुपोषणाला प्रभावी आळा घालेल असेही ते म्हणाले.
कुपोषण कमी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून याअंतर्गत माता व बाल स्वास्थ संवर्धन योजनेची प्रभावी अमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालयाच्या प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी मुख्यालयाला टाऊनशिपचे स्वरूप देणार असल्याचे सांगून त्याचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासोबतच हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे पेसा कायदा, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडेच जव्हार राजवाड्यास मी भेट दिली. पर्यटनाची स्थळे पाहता जिल्ह्याला पर्यटनात खूप चांगले स्थान प्राप्त होऊ शकते व चालना मिळू शकते यासाठी आपण महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रमुख विजय वाघमारे यांच्याशी चर्चा केली असून पर्यंटनवाढीसाठी त्यांचे योग्य ते सहकार्य मिळणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात आपण मोहीम हाती घेतली असून दोषी कारखान्यांविरोधात अलीकडेच कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्ह्यात कुठेही कारखाने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करीत असतील तर स्थानिकांनी त्याबाबतची आपली तक्रार या समितीकडे करावी असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या डिपिडीसी योजनेचा निधी जिल्हा नियोजनातून वर्ग झाल्याचीमाहितीही त्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे रुजू झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच पत्रकार परीषद होती. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांची ओळख करून घेतली व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आभार व्यक्त केले.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमधील मुलांना अंडी देण्याची योजना आपण प्रस्तावित केली असून याअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये १७ हजार अंडी लागणार आहेत,त्यासाठी हि अंडी बाहेरून विकत न घेता जिल्ह्यातील बचतगटाना कुकुटपालन योजना देऊन त्यांच्यामार्फत ती घेणार असून त्यामुळे हे बचत गट आर्थिक सक्षम होतील व अंगणवाड्यांना पोषण आहारही मिळेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
पत्रकार हा समाजाला जवळून पाहतो त्याचे प्रश्न सोडवण्यास मदत करतो असे मुद्दे आपण मला निदर्शनास आणून दिल्यास मी त्यावर तातडीने कारवाई करीन असे सांगून पत्रकारांनी उपस्थित केलेले अनेक मुद्दे नोंदवून घेत ते पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे मी पाठवत असून त्यांना याबाबत योग्य काळानंतर विचारणा करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.