मोटारसायकल अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन; आरोग्यमंत्र्यांना मिळाली लंडन प्रयोगातून प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:06 AM2018-08-03T03:06:18+5:302018-08-03T03:06:40+5:30
या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले.
- हुसेन मेमन, रविंद्र साळवे
मोखाडा : या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे आयोजन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेले होते. याप्रसंगी डॉ.सावंत यांनी १०८ मोटारसाईकल अॅम्ब्युलन्स लंडन येथे बघितल्यानंतर अशी सेवा प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे दहा मोटारसायकल अॅम्ब्युलन्सच्या स्वरूपात सुरू करण्यात आली व तिने आजवर अडीच हजार रुग्णांचे प्राण वाचवले, असे सांगितले.
या अॅम्ब्युलन्सचा उपयोग चांगला होत असल्याने अशा पाच मोटारसायकल अॅम्ब्युलन्स पालघर जिल्ह्यासाठी देण्याचा निर्णय मी घेतला. या अॅम्ब्युलन्सचा राईडर हा स्वत: डॉक्टर असल्याने रुग्णांपर्यत वेळीच औषध उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच राज्यात अजून चाळीस मोबाईल मेडिकल युनिट चालू करणार असून यातील काही युनिट पालघर जिल्ह्यासाठी देण्यात येतील यामध्ये औषधे, एक्स रे मशिन, डॉक्टर्स, लॅबोरटरी, मेडिसन इत्यादी अत्याधुनिक सोयी सुविधा असतील. मोखाड्यातील कुपोषण व बेरोजगारीचे प्रमाण घटविण्यासाठी जंगलातील औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदीक औषधनिर्मितीची कंपनी चालू करण्याची योजना आहे. या कंपनी मार्फत आदिवासींना रोजगार उपलब्ध करुन कुपोषणावर मात कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुक्यात ३२७ बालके कुपोषित असून ५३ बालके मृत्यूच्या दाढेत आहेत व नुकतेच २ बालमृत्यू झाले असतांना मंत्र्यांनी त्या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेण्याचे टाळले. त्याचबरोबर या रुग्णालयात सीमेन्स व आरोहण या सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सोनोग्राफी मशिन चा लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी जिल्ह्यातील साडे दहा हजार शेतकऱ्यांना आंबा, काजू यासारखी रोपे मोफत देऊन ती वर्षा पर्यत लाभार्थ्यास प्रती दिवस शंभर रु पये मजुरीसह देण्यात येईल असे सांगितले. तर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी रोजगार हमी ची कामे लवकर सुरू करावीत व त्याची मजुरी आॅनलाईन जमा न करता काम झाल्या नंतर लगेचच मजुरांना द्यावी तसेच आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवावे, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली. या कार्यक्र मास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानरे, सीमेन्स व आरोहणचे डॉ.श्रीनिवास, अनिस मोहम्मद, अंजली कानेटकर, हेलेन जोशी, वैद्यकीय अधिक्षक महेश पाटील, नगराध्यक्षा चौधरी,गटविकास अधिकारी गोंडाबे, नासब तहसिलदार कोरडे, शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.