ग्रामीण भागातील शाळांसमोर अडचणींचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:17 AM2020-11-21T00:17:50+5:302020-11-21T00:17:50+5:30
शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात.
- शशिकांत ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
कासा : राज्यातील इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या शाळा २३ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता असून त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, मात्र ग्रामीण भागातील शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवाॅश, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था, अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे. स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दररोज चाचणी म्हणजेच थर्मल स्क्रीनिंग करावे आदी अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत.
शाळा, वर्ग दररोज सॅनिटायझिंग करणे, स्वच्छता पुरविणे तसेच इतर साहित्य आदी बाबी खर्चीक आहेत, मात्र शाळांना आता वेतनेतर अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा खर्च कोठून करायचा, तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे शाळेत शिपाई संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ही सॅनिटायझिंग, स्वच्छतेची कामे रोज कशी करणार, अशा समस्या शाळांपुढे आहेत.
शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, मात्र विद्यार्थ्यांना तशी अट नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून लांबून ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे त्यामध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शिक्षक कोरोना चाचणीबाबतीत आरोग्य विभागाकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक अजून चाचण्या करू शकले नाहीत.
अनेक आव्हानात्मक परिस्थितींचा सामना शाळा सुरू करताना व झाल्यावर करावा लागणार आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंब व भागांतून येणारे आहेत तसेच सॅनिटायझर व इतर सुविधा सरकारकडून पुरविल्या जाव्यात.
- पी.टी. पाटील, अध्यक्ष,
पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना
पालकांशी संपर्क साधला असता बरेच पालक आपल्या पाल्यास पाठविण्यास तयार नाहीत. कारण वाहतूक व्यवस्था व इतर समस्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्था शासनाने कराव्यात.
- वागेश कदम, अध्यक्ष,
संस्था चालक संघटना, पालघर जिल्हा
कोरोना विषाणूसंदर्भात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये. त्याआधी शाळा सुरू केल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
- विजय जाधव,
पालक