नालासोपाऱ्यात अनैतिक व्यवसायाविरोधात आंदोलन
By Admin | Published: February 23, 2017 05:21 AM2017-02-23T05:21:43+5:302017-02-23T05:21:43+5:30
नालासोपारा रेल्वे परिसर आणि लगतच्या लॉजेसमध्ये सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात आंदोलन करण्यात आले
वसई : नालासोपारा रेल्वे परिसर आणि लगतच्या लॉजेसमध्ये सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी याची दखल घेऊन कठोर कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे स्टेशनसह स्टेशन परिसरात असलेल्या लॉजेसमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. त्याविरोधात शहरातील सर्वपक्षीय तरुणांनी एकत्रितपणे लढा सुुरु केला आहे. त्याच्याच एक भाग म्हणून मंगळवारी संध्याकाळी स्टेशनजवळ तरुणांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले. प्रशासनाने या विरोधात कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निळेगावातील तरुणांनी यावेळी दिला.
दरम्यान, वसई रोड रेल्वे परिसरात सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वसई रोड रेल्वे स्टेशन, नवघर एसटी स्टँड, आनंद नगर परिसरात असंख्य वारांगना पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरून गिऱ्हाईक शोधत असतात. याप्रकरणाला लोकमतमधून वाचा फोडण्यात आली होती. त्या बातमीचे बॅनर वसई रोड रेल्वे परिसरात लावण्यात आले आहेत. त्यानंतर आता नालासोपारा शहरातही अनैतिक व्यवसायाविरोधात गावकरी संघटीत झाल्याने अनैतिक व्यवसाय चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)