उपवन संरक्षकांच्या विरोधात आंदोलन, आदिवासींना केला शेती करण्यास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:39 AM2019-07-05T00:39:21+5:302019-07-05T00:39:45+5:30
वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे.
जव्हार : जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनी वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींवर गुन्हे दाखल करून जंगलात फिरण्यास मनाई केली आहे. तर वन प्लॉटधारकांची शेतावरील घरे उद्ध्वस्त करून त्यांना बुजणी, राबणी व शेती करण्यास मनाई केली आहे. म्हणून श्रमजीवी संघटनेने आवाज उठवीत उपवन संरक्षक यांच्या वनविभागाच्या दालनात एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे.
त्यांनी वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे. येथील वन प्लॉटधारक आदिवासी कुटुंबेही गेल्या अनेक वर्षांपासून जंगलातील गावठी भाज्या, फळभाज्या, डिंक याचे उत्पादन घेत होते त्यावर बंदी घातली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून वन प्लॉट असलेल्या झोपडीवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. त्यामुळे येथील जंगलातील आदिवासी कुटुंब भेदरली आहेत. त्यामुळे वनपन संरक्षकांच्या दालनात श्रमजीविच्या नेतृवाखाली धरणे धरण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी व डोंगराळ भाग आहे. येथील शेकडो आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी असे रोजगाराचे कुठलेही साधन नाही. तर शासनातर्फे वर्षभर रोजगार हमीचं कामही मिळत नाही. जे काही रोजगार हमीचे काम मिळते ते फक्त उन्हाळ्यात. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना रोजगारासाठी वन प्लॉटवर अवलंबून राहावे लागते. मात्र वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनी वन विभागाचे नियम अटींचा बडगा उगारला आहे.
वनखात्याची दंडेली
वन विभागाने मोजणी करून दिलेल्या वन प्लॉटात झाडांची लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यास सुरवात केली आहे. तर आदिवासी हे जंगल नाश करणारे आहेत. असे समजून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आदिवासींनी श्रमजीविचा आधारघेत बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन केले.