शितपेट्यांसाठी नायगांव कोळीवाड्यातील कोळी महिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 06:10 PM2021-12-25T18:10:35+5:302021-12-25T18:10:43+5:30
दरम्यान यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी सच्चिदानंद शेवाळे यांना जाब विचारत महिलांनी त्यांना घेराव घातला.
- आशिष राणे
वसई- वसई तालुक्यातील नायगांव कोळीवाड्यातील कोळी महिलांना मासळी साठवून ठेवण्यासाठी मत्स्यविभागाकडून शितपेट्या मिळतात मात्र मागील ९ महिन्यांपासून शितपेट्या मिळण्यापासून वंचित राहीलेल्या नायगाव कोळीवाडा विभागातील कोळी महिला संतप्त झाल्याने अखेरीस या कोळी महिलांनी येथील नायगांव मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये गुरुवार ( दि. 23) रोजी आंदोलन केले यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.
दरम्यान यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी सच्चिदानंद शेवाळे यांना जाब विचारत महिलांनी त्यांना घेराव घातला. शितपेट्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्या जवळ शितपेट्यांची महिलांची यादीच नसल्याचे त्यांनी सांगितले. याउलट शितपेट्यांऐवजी कोळी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार असल्याचे ही शेवाळे यांनी सांगितले, मात्र ना शितपेट्या आल्या ना खात्यात पैसे आले त्यानुसार या कोळी महिलांनीं संस्थेच्या सेक्रेटरींवर त्याचा रोष काढला.
एकुणच अर्नाळा व खानिवडे या दोन्ही कोळीवाडयात या शितपेट्या दिल्या गेल्यात मग अजूनपर्यंत नायगाव कोळीवाडा मधील महिलांना अद्यपही शितपेट्या मिळाल्या नसल्याने त्रस्त कोळी महिलांनी हे आंदोलन केल्याचे नायगाव कोळीवाडा ग्रामस्थांनी लोकमत ला सांगितले. कोळी महिला या शितपेट्या मध्ये आपली मच्छी ठेवण्यासाठी उपयोगात आणतात जर शितपेट्या नसतील तर मच्छी विक्री व मच्छीची ने- आण कशी करणार त्यात या शितपेट्याची किंमत एक नग साधारण ६ हजार रुपये पर्यंत आहे.
आम्हाला शितपेट्या मिळण्यासाठी आम्ही मार्च 2021 रोजी अर्ज केले होते परंतु आज ९ महिने उलटूनही शितपेटी दिल्या नाहीत, अशा शितपेट्या अर्नाळा कोळीवाड्यासह दुसर्या अनेक कोळीवाड्यात देण्यात आले पण आम्हाला अजून दिल्या नाही, याबाबत आम्ही हा घेराव केला.
-रसिका कोळी नायगाव कोळीवाडा, वसई (पश्चिम)