दिव्यांगांच्या आमदार निधीवरून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन
By धीरज परब | Published: July 15, 2024 07:41 PM2024-07-15T19:41:00+5:302024-07-15T19:44:29+5:30
आमदार जैन यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन; दिव्यांगांची फसवणूक करून राजकीय हेतूने स्टंटबाजी केल्याचा भाजपा दिव्यांग सेलचा आरोप
मीरारोड - आमदारांच्या माध्यमातून खर्च होणाऱ्या दिव्यांग निधीचा वापर किती दिवसात करणार याचे लेखी पत्र द्या अशी मागणी करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आमदार गीता जैन यांच्या कार्यालय बाहेर अचानक आंदोलन केले. यावेळी आ. जैन सह आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केले गेले. तर आमदारांचा दिव्यांग साठीचा निधी नुकताच मंजूर झाला असून त्यासाठी राजकीय संघटनेला पत्र देण्याचा प्रश्नच येत नाही. दिव्यांगांची फसवणूक करून राजकीय हेतूने प्रहार ने आंदोलन केल्याचा आरोप भाजपच्या दिव्यांग सेल ने केला आहे.
आमदारांना शासना कडून येणाऱ्या निधीतील दिव्यांगांसाठी पूर्वी १० लाखांच्या खर्चाची मर्यादा होती. ती वाढवून ३० लाखांची केले गेली आहे. आमदारांच्या शिफारशीनुसार गरजू दिव्यांगांना आवश्यक साहित्य आदींचे वाटप केले जाते. त्याच्या खरेदी खर्चाची मंजूर जिल्हाधिकारी यांच्या कडून होते. दरम्यान सोमवारी प्रहार दिव्यांग संस्थेच्या मीरा भाईंदर अध्यक्षा काजल नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या काही दिव्यांग कार्यकर्त्यांनी न्यू गोल्डन नेस्ट येथील आमदार गीता जैन यांच्या कार्यालय बाहेर जमून आंदोलन केले व घोषणा दिल्या.
आमदारांनी दिव्यांगांचा निधी वापरण्या बद्दल १५ दिवसांच्या मुदतीची तारीख टाकून पत्र द्यावे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या कडून पण पत्र घेऊन राहणार अन्यथा त्यांच्या कार्यालय बाहेरपण आंदोलन करणार असा इशारा काजल नाईक यांनी दिला. ह्या आधी दोन्ही आमदारां विरुद्ध आंदोलन केले पण ते आंदोलनात भेटायला आले नाही. एका दिव्यांगाचे घर तुटले. आ . जैन व सरनाईक यांनी घर तुटले म्हणून प्रत्येकी १०-१० हजार मदत करावी पण त्यांचे उत्तर नाही. आमदारांच्या पीए ना वेळोवेळी सांगून व पत्र देऊन देखील दुर्लक्ष केले गेले असे नाईक म्हणाल्या.
दरम्यान भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष संजय सुरवसे यांनी सांगितले की, दोन्ही आमदारांच्या विरोधातील एका नेत्याच्या इशाऱ्यावरून आणि सदर दोन्ही आमदारांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हि स्टंटबाजी केली गेली आहे. आमदार निधीच्या खर्चाचे पत्र स्वतःच्या नावाने मिळवण्याचा अट्टहास आणि त्यासाठी दिव्यांगांची दिशाभूल करून त्यांना वेठीस धरून आंदोलन करणे चुकीचे आहे.
आमदार गीता जैन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुक आचार संहिता मुळे रखडलेल्या दिव्यांग निधीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यातून गरजू दिव्यांगांना साहित्य दिले जाणार असून त्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. मात्र कोणा राजकीय संघटनेच्या व्यक्तीच्या नावाने आमदार निधीचे पत्र कसे देणार? आपण त्यावेळी कार्यालयात नसताना मुद्दम आंदोलन केले गेले. दिव्यांगांना कार्यालयात येऊन बसा सांगितले तसेच चहा - नाश्ता सुद्धा विचारला होता.