अंशकालीन शिक्षकांचे आंदोलन, वाडा पंचायत समिती कार्यालयात मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:45 PM2019-05-10T23:45:49+5:302019-05-10T23:46:11+5:30
वाडा तालुक्यात २८ अंशकालीन शिक्षकांना गेली तीन वर्षे मानधन न दिल्याचा निषेधार्थ व त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन शिक्षकांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयातच शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले
वाडा - तालुक्यात २८ अंशकालीन शिक्षकांना गेली तीन वर्षे मानधन न दिल्याचा निषेधार्थ व त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन शिक्षकांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयातच शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून तेथेच चूल मांडून जेवण शिजविण्यात आले.
शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य व कार्यानुभव या विषयांकरिता अंशकालीन निर्देशक नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार वाडा तालुक्यात २८ शिक्षक कार्यरत असून वर्ष २०१६ पासून या शिक्षकांना अल्प मानधन मिळाल्याने शिक्षकांचा प्रवासखर्चही भागत नाही अशी तक्र ार या शिक्षकांची आहे.
जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन शिक्षक म्हणून मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रतिमहा ५ हजार मानधन देणे बंधनकारक असताना वाडा तालुक्यातील अंशकालीन शिक्षकांना मात्र तासिका पध्दतीचे निकष लावून गेल्या तीन वर्षात अल्प मानधन दिल्याने या शिक्षकांवर अन्याय झाल्याने शिक्षकांच्या या मानधनाच्या प्रश्नाकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.१०) या शिक्षकांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करत ठिय्या मांडला आहे. तसेच मानधन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु च राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजिवी संघटनेचे नेते रूपेश डोळे, किशोर मढवी, मनोज काशिद हे करीत आहेत. या आंदोलनात श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अंशकालीन शिक्षक प्रतिनिधी रेखा पराड, मोनिका वलटे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
अंशकालीन शिक्षक म्हणून अल्प मानधनावर आम्ही काम करत असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यात दरमहा ५ हजार मानधन दिले असताना आमच्यावरच अन्याय का? यावर्षी वर्षभराचे अवघे १५ हजार मानधन काढलेय. त्याने आमचे भाडेही वसूल होत नाही. जीआर आम्हालाच लागू आहे का? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.
- शिल्पा पाटील, अंशकालीन शिक्षिका
अंशकालीन शिक्षकांना प्रतितासिका ५० रुपयांप्रमाणे महिन्याला शंभर तासिका झाल्यास ५ हजार रु पये मानधन देण्याची तरतूद आहे. जिल्हा स्तरावरून आलेल्या सूचनाप्रमाणे तासिकांप्रमाणे मानधन काढण्यात आले आहे. हे मानधन तासिका पद्धतीने मुख्याध्यापकांमार्फत अदा केले जाते. शिक्षकांच्या मागणीचा विचार करु.
- विजय बाराथे, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, वाडा