जिंदाल बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन

By admin | Published: October 9, 2015 11:32 PM2015-10-09T23:32:25+5:302015-10-09T23:32:25+5:30

पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी

Movement till Jindal cancellation | जिंदाल बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन

जिंदाल बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन

Next

बोईसर : पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शुक्रवारी जिंदाल कंपनीवर मोर्चा काढून किनारपट्टीवरील ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला. त्याप्रसंगी शिवसेनेव्यतिरिक्त सर्वपक्षीय नेते, दोन माजी तर एक विद्यमान आमदार व शाळकरी विद्यार्थी आणि महिला, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आॅक्टोबर २०१२ मध्ये जिंदाल बंदरासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी तारापूर एमआयडीसीमध्ये घेण्यात आली. त्या जनसुनावणीस पालघर तालुक्यातील सुमारे पंधरा हजार ग्रामस्थ उपस्थित राहून एकमुखाने जिंदालच्या बंदरास विरोध व हरकत नोंदवली. एवढा प्रचंड विरोध होऊनही आवश्यक त्या सर्व परवानग्या जिंदाल बंदरास मिळाल्या आहेत, त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून नांदगाव, आलेवाडी, मुरबे, नवापूर व गुंदवली इ. गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी एमआयडीसीमधील कॅम्लिन नाका ते जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रतीकात्मक तिरडी वाहून मोर्चा काढण्यात आला होता. ती तिरडी वाहण्यासाठी महिलांनी अधिक पुढाकार घेतला होता.
मोर्चासमोर विद्यमान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, विधानसभेत मी जिंदाल बंदराला सर्वप्रथम विरोध केलाच आहे. परंतु, उद्या कोर्टापर्यंत जावे लागले तरीही माझी तयारी असल्याचे सांगितले. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शिवसेनेने परवा श्रेय घेण्याकरिता मोर्चा काढल्याचे सांगून कुठल्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नसून स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या बंदराला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.
माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी वापकोस कंपनीने किनारपट्टीवरील स्थितीची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणारा अहवाल तयार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी हे आंदोलन कुठल्या पक्षाचे नसून गावकऱ्यांचे आहे. कुणीही मक्तेदारी समजू नये तर जनभावनेच्या विरोधात असलेला प्रकल्प गाडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले.
बहुजन विकास आघाडीच्या प्रशांत पाटील यांनी बंदराला हद्दपार करण्यासाठी जिल्हा बंद करण्याचे आवाहन करून डोंगरी व सागरी भागातील नागरिक एकत्र आले तर ते कुणालाही थोपवणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. आरपीआयच्या सचिन लोखंडे यांनी हक्कासाठी आगीशीही लढण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. मनसेचे नांदगावचे सदस्य धीरज गावंड यांनी प्रतीकात्मक तिरडी काढली. वेळ पडली तर खरोखर तिरडी काढण्यास मागेपुढे पाहिले जाणार नसल्याचे सांगितले, तर नांदगावच्या सरपंच विधी मोरे, आलेवाडीच्या सरपंच वैष्णवी ठाकूर, मुरब्याच्या सरपंच प्रज्ञा तरे, नवापूरच्या सरपंच अंजली बारी, कुंभवलीच्या माजी सरपंच तृप्ती संखे, टेंथीचे कुशल राणे, दांडीचे कुंदन दळवी, शाळकरी विद्यार्थिनी श्रद्धा ठाकूर, आलेवाडीचे उपसरपंच सुनील पंडित इ. सर्वांनी बंदराला प्रखर विरोध करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. (वार्ताहर)

Web Title: Movement till Jindal cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.