महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:49 AM2020-06-06T00:49:33+5:302020-06-06T00:49:45+5:30

लॉकडाऊनमुळे होती बंद : पालिका आयुक्तांची सशर्त परवानगी

MSEDCL electricity bill payment centers started | महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू

महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : लॉकडाऊनमुळे मागील दोन महिने बंद असलेली वसई तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातील महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे आता पुन्हा सुरू झाली आहेत. सुरक्षित अंतराचे नियम व आरोग्याच्या उपाययोजना पाळून ही केंद्रे सुरू करण्याची सशर्त परवानगी पालिका आयुक्तांकडून देण्यात आल्याची माहिती महावितरणचे वसई अधीक्षक अभियंता मंदार अत्रे (प्रभारी) यांनी ‘लोकमत’ला दिली.


वीज ग्राहकांनी नजीकच्या महावितरण किंवा सहकारी पतसंस्थांमध्ये सुरू असलेल्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणनेही वीजबिल भरणा केंद्रे बंद ठेवली होती. चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यावर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महावितरणने वीजबिल भरणा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला व अलीकडेच याबाबत मुख्य अभियंता कल्याण येथून निर्देशही देण्यात आले आहेत.


यानुसार वसई महावितरणने तालुक्यातील ग्रामीण भागासाठी पालघर जिल्हाधिकारी व शहरी भागातील पालिका हद्दीतील वीज भरणा केंद्र व पतसंस्थांमार्फतचे वीज बिल केंद्र सुरू करण्यासाठी वसई-विरार शहर महापालिका आयुक्त यांच्याकडे परवानगी मागितली होती. पालघरचे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी देखील सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाईज व गर्दी होणार नाही आदी अटी व शर्थींचे पालन व आरोग्यविषयक खबरदारी घेत महावितरणला वीज बिले भरणा केंद्र सुरू करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे आता ग्राहकांना नजीकच्या केंद्रांवर वीज बिले भरणे सोयीचे होणार आहे.


वीजबिल भरणा केंद्रांवर ग्राहकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत, मास्क वापरावे, अशा सूचना केल्या आहेत. गेले दोन महिने वीजबिल भरणा केंद्रे बंद होती, मात्र आता वीज ग्राहकांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर किंवा महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपच्या आधारे वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन प्रभारी अधीक्षक मंदार अत्रे यांनी केले आहे.

Web Title: MSEDCL electricity bill payment centers started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.